एकाच वेळी रॅम्पवर अवतरले क्रिकेट-बॉलिवूड जगत
By admin | Published: September 5, 2016 05:44 AM2016-09-05T05:44:03+5:302016-09-05T05:49:54+5:30
क्रिकेटपटू युवराज सिंगने मुंबईत आपल्या दिमाखदार फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगताला एकत्र आणून एक चॅरिटी शो सादर केला.
मुंबई : भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक कामगिरी केलेला स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने मुंबईत आपल्या दिमाखदार फॅशन सोहळ्याच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड जगताला एकत्र आणून एक चॅरिटी शो सादर केला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून जमा झालेला सर्व निधी युवराज आपल्या कॅन्सरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या ‘युवीकॅन’ या संस्थेला दान करणार आहे.
शनिवारी रात्री मुंबईत एका कार्यक्रमामध्ये युवराजने ‘युवीकॅन फॅशन’ सादर करुन बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील स्टार्सना एकत्रित आणले. युवराजच्या या हटके सोहळ्याने अनेक व्यावसायिक फॅशन शोची हवा काढली. विशेष म्हणजे, महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून सध्या सोशल वेबसाइटवर तुफान फटकेबाजी करणाऱ्या वीरेंद्र सेहवागपर्यंत सर्वांनीच उपस्थिती लावल्याने या कार्यक्रमाला चार चाँद लागले.
अमिताभ बच्चनसह दीपिका पदुकोन, अर्जुन रामपाल, फरहान अख्तर, फराह खान, बॉबी देओल यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत होती. तर, दुसरीकडे सेहवागसह ख्रिस गेल, ड्वेन ब्रावो, झहीर खान, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मोहम्मद कैफ, हॉकी कर्णधार पी. आर. श्रीजेश आणि आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार यांनीही आपला जलवा दाखवला. तसेच, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया, महिला गोल्फर शर्मिला निकोटकर व क्रिकेटपटू आशिष नेहरा यांचीही विशेष उपस्थिती यावेळी होती.
दरम्यान, या कार्यक्रमातून मिळणारी निधी कॅन्सरग्रस्तांसाठी कार्य करणाऱ्या आपल्या ‘युवीकॅन’ संस्थेला देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी युवराजने केली. (वृत्तसंस्था)
>२०१२ साली युवीकॅन संस्थेची स्थापना केली, तेव्हा निधी जमा करण्यास मला अनेक अडचणी आल्या. मला एका मोठ्या रकमेची आवश्यकता होती. मला विश्वास आहे की, माझी गोष्ट लोकांना नक्कीच प्रेरित करेल. जीवनात कधीच हार मानू नका. जीवन, साहस आणि प्रेरणा हे आपले ध्येय आहे.
- युवराज सिंग