साना शेट्टी आणि हर्ष पाचौरी सर्वोत्तम; गोकुळधामला सांघिक विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 05:44 PM2018-12-10T17:44:46+5:302018-12-10T17:45:35+5:30
प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सव
मुंबई, १० डिसेंबर : उंच उडी प्रकारात नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्ण आणि लांब उडीमध्ये रौप्य पदक पटकावणारी साना शेट्टी (विसनजी अकादमी) आणि रायन इंटरन्याशनल – मालाडचा हर्ष पाचौरी हे ४१ व्या प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सवातील एथलेटीक्स प्रकारात सर्वोत्तम ठरले. सानाने उंच उडी प्रकारात १.४८ मीटर्स अंतर पार केले तर त्यानंतर लांब उडी प्रकारात ४.५९ मीटर्सची झेप घेतली . हर्ष पाचौरी याने मुलांच्या १४ वर्षाखालील वयोगटात ६०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक विजेती कामगिरी केली. या दोघांची एकूण कामगिरी विचारात घेत आय.ए.ए.एफ. च्या नॉर्मनुसार गुण बहाल करीत त्यांना सर्वोत्तम एथलीट म्हणून घोषित करण्यात आले. गोकुळधाम हायस्कूल यांनी सर्वाधिक ९८ गुणांसह सांघिक विजेतेपदाचा मान मिळविला तर लक्षधाम हायस्कूल-गोरेगाव यांना ७८
गुणांसह उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
एथलेटीक्स स्पर्धेत तीन सुवर्ण पदके पटकावण्याचा मान श्रीहर्षिता बोबिली (लोखंडवाला-कांदिवली) हिने मिळविला. तिने १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत १३.४ सेकंद, २०० मीटर्स मध्ये २८.७ सेकंद आणि ४०० मीटर्स मध्ये ६७.९ अशी वेळ नोंदवत १६ वर्षाखालील मुलींच्या गटात तीन सुवर्ण पदकांचा मान मिळविला. मुलींमध्ये सहा जणींनी दुहेरी सुवर्ण पद्कांचा मान मिळविला. हर्षिता शेट्टी (लोखंडवाला – कांदिवली) हिने गोळाफेक प्रकारात १२.३२ मी. आणि थाळीफेक प्रकारात ३२.९० मी. अशी फेक करीत १६ वर्षाखालील मुलींच्या गटात नवीन स्पर्धा विक्रमाची नोंदही केली.
साक्षी वाफेलकर (महात्मा गांधी विद्यामंदिर) या आणखी एका एथलीटने याच वयोगटात दुहेरी सुवर्ण पदकांचा मान मिळविताना ८०० मीटर्स (२ मी. ४६.८ सेकंद) आणि २०० मीटर्स शर्यतीत ८ मी. ०३.८ सेकंद अशी वेळ नोंदवत अन्य स्पर्धकाना मागे टाकले. किआ पिसाट (गोकुळधाम) हिने १०० मीटर्स (१३.३ सेकंद ) आणि २०० मीटर्स मध्ये २८.३ सेकंदासह स्पर्धा विक्रमाची बरोबरीही केली.
प्रीस्टल डिसूझा हिने गोळा फेक (९.६९ मी.) आणि थाळीफेक (२५.०७ मी.) अशी कामगिरी करून १४ वर्षाखालील गटात दोन सुवर्ण पदके मिळविली तर लक्षधामच्या जोशीका राणी हिने ८ वर्षाखालील वयोगटात ५० मीटर्स (८.६) आणि १०० मीटर्स (१७.४) शर्यतीत विजेतेपद पटकावले. चिल्ड्रन्स अकादमीच्या दिव्यम शाह याने भालाफेक प्रकारात (३६ मी.)आणि लांब उडीत (५.७९ मी.) अव्वल कामगिरी केली तर गगन अमीन (राधाकृष्णन) यानेही १६ वर्षाखालील गटात ८०० मीटर्स (२ मी. २३.७ सेकंद) आणि २००० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत (७ मी. ०९.४ सेकंद) सर्वोत्तम कामगिरी करून दुहेरी सुवर्ण पदके मिळविली. हर्ष ठाकूर (गोकुळधाम) याने १४ वर्षाखालील वयोगटात १०० मीटर्स (१२.५ सेकंद) आणि २०० मीटर्समध्ये (२६.३ सेकंद) विजयी कामगिरी केली, दर्शन ठाकरे (गोकुळधाम) याने १० वर्षाखालील मुलांच्या गटात ५० मीटर्स (७.६ सेकंद ), १०० मीटर्स मध्ये १४.८ सेकंद आणि लांब उडीत ३.८२ मी.) अशी कामगिरी केली तर शोन मेंडोंसा याने ८ वर्षाखालील मुलांच्या गटात ५० मीटर्स (८.३ सेकंद ) आणि १०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत (१६ सेकंद ) नवीन स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पदक अशी कामगिरी केली.