संगकाराने केली निराशा
By admin | Published: August 23, 2015 11:43 PM2015-08-23T23:43:18+5:302015-08-23T23:43:18+5:30
श्रीलंकेच्या महान क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेला कुमार संगकारा भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पी. सारा ओव्हल स्टेडियममध्ये कारकिर्दीतील
कोलंबो : श्रीलंकेच्या महान क्रिकेटपटूंमध्ये समावेश असलेला कुमार संगकारा भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पी. सारा ओव्हल स्टेडियममध्ये कारकिर्दीतील अखेरचा डाव खेळण्यासाठी फलंदाजीला आला, त्या वेळी प्रेक्षकांनी उभे राहून या महान खेळाडूचे अभिवादन केले, तर प्रतिस्पर्धी भारतीय संघाने त्याला ‘गार्ड आॅफ आॅनर’चा सन्मान बहाल केला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३७ वर्षीय संगकारा ज्या वेळी पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरला त्या वेळीही गार्ड आॅफ आॅनर दिला होता. संगकाराला मात्र अखेरच्या डावामध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने तीन चौकारांच्या साह्याने १८ धावा फटकावल्या. संगकारा आणखी काही वर्षे खेळू शकला असता; पण या महान खेळाडूने निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
संगकाराच्या चमकदार कारकिर्दीचा निराशाजनक शेवट झाला. आश्विनने या मालिकेत चारही डावांत या दिग्गज फलंदाजाला बाद केले. संगकारा मैदानात उतरला त्या वेळी भव्य स्वागत झाले आणि तंबूत परतताना हेच चित्र कायम होते. भारतीय खेळाडूंनीही त्याच्यासोबत हस्तांदोलन केले.