संघ समतोल : महेंद्रसिंग धोनी
By admin | Published: March 5, 2016 03:02 AM2016-03-05T03:02:54+5:302016-03-05T03:02:54+5:30
भारतीय संघ समतोल असून कुठल्याही वातावरणात आणि कुठल्याही प्रतिस्पर्ध्याचे आव्हान पेलण्यास टीम इंडिया सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली
मीरपूर : भारतीय संघ समतोल असून कुठल्याही वातावरणात आणि कुठल्याही प्रतिस्पर्ध्याचे आव्हान पेलण्यास टीम इंडिया सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने सलग चार सामने जिंंकण्याचा पराक्रम केला आहे.
संयुक्त अरब अमिरातविरुद्ध आशिया कप टी-२० स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने यंदा खेळल्या गेलेल्या १० टी-२० सामन्यांपैकी ९ सामन्यांत विजय मिळवण्याची कामगिरी केली.
संयुक्त अरब अमिरातविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, ‘भारतीय संघ सध्या शानदार फॉर्मात आहे. आम्ही यंदा आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत टी-२० मालिकेत पराभूत केले. त्यानंतरही भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखले आहे. भारतीय संघाच्या सध्याचा कामगिरीचा विचार करता हा संघ कुठल्याही संघाविरुद्ध चमकदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे दिसून येते.’
जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये गणल्या जाणारा धोनी म्हणाला,‘संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये विजयाची भूक दिसून येते. सर्वंच खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास सज्ज आहेत. संघात तीन नियमित वेगवान गोलंदाज, दोन जागतिक दर्जाचे फिरकीपटू आणि कामचलावू चांगले गोलंदाज आहेत. याव्यतिरिक्त फलंदाजीची बाजूही मजबूत आहे. आमच्याकडे आठव्या क्रमांकापर्यंत चांगले फलंदाज आहेत. त्यामुळे संघाला बळकटी मिळाली आहे. संघात गोलंदाज व फलंदाज यांच्या व्यतिरिक्त चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये शानदार कामगिरी करण्याची क्षमता आहे.’
बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘बांगलादेश संघ शानदार फॉर्मात असून त्यांना कमी लेखण्याची चूक करता येणार नाही. त्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. अंतिम लढतीबाबत आम्ही गंभीर असून जेतेपद पटकावत पुढील आठवड्यात प्रारंभ होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत उंचावलेल्या आत्मविश्वासासह सहभागी होण्यास प्रयत्नशील आहेत.’ (वृत्तसंस्था)
> माहीला विक्रमाच्या बरोबरीची संधी
नवी दिल्ली : टष्ट्वेंटी-२0 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत जास्त सामन्यात नेतृत्व भूषविण्याचा विक्रम आपल्या नावावर असणारा भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या झटपट फॉर्मेटमध्ये सलग सर्वांत जास्त सामने जिंकण्याच्या त्याच्याच विक्रमाची बरोबरी करायची संधी असणार आहे.
धोनी सलग सात सामने जिंकण्याच्या त्याच्या विक्रमाची बरोबरी आशिया कप फायनलमध्ये करू शकतो. भारत आशिया कपमध्ये सलग चार सामने जिंकला आहे आणि आता फायनलमध्ये रविवारी यजमान बांगलादेशविरुद्ध दोन हात करायचे आहेत. धोनी सलग सहा सामने जिंकला आहे. टष्ट्वेंटी-२0 मध्ये सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम संयुक्त रूपाने इंग्लंड आणि आयर्लंड यांच्या नावावर आहे. भारताने यावर्षी १0 टष्ट्वेंटी-२0 सामने खेळले आहेत, त्यापैकी नऊ सामने जिंकले आहेत.
भारताने या वर्षाच्या प्रारंभी आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सलग तीन सामने जिंकून ऐतिहासिक सफाया केला होता; परंतु घरच्या मालिकेत वर्ल्डचॅम्पियन श्रीलंकेकडून भारताला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुढील दोन सामने जिंकताना भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.
टीम इंडियाने त्यानंतर आशिया कपमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले. नंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. श्रीलंकेला पुन्हा एकदा पराभूत केले आणि यूएईला क्रिकेटचा धडा शिकविला. भारतीय संघ आशिया कप फायनलमध्ये यजमान बांगलादेशविरुद्ध रविवारी खेळणार आहे.
भारताने याआधी सलग सात सामने जिंकले आहेत. जे की त्यांनी २0१२, २0१३ आणि २0१४ मध्ये मिळविले होते. तेव्हा भारताने डिसेंबर २0१२ मध्ये पाकिस्तान, आॅक्टोबर २0१३ मध्ये आॅस्ट्रेलिया, मार्च २0१४ मध्ये पाकिस्तान, वेस्ट इंडीज, बांगला देश आणि आॅस्ट्रेलियाला तसेच एप्रिल महिन्यात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली होती. इंग्लंडच्या संघाने २0१0 मध्ये सलग आठ सामने आणि आयर्लंडने २0११-१२ मध्ये सलग आठ सामने जिंकले होते.
भारतीय संघाने रविवारी जर आशिया कप जिंकला, तर धोनी आपल्या विक्रमाची बरोबरी करेल आणि याच महिन्यात भारतात होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक टष्ट्वेंटी-२0 सामने जिंकण्याचादेखील विक्रम करू शकतो.
> कॅप्टन कुलने दडपण कमी केले : नेगी
संयुक्त अरब अमिरातविरुद्ध आशिया कपमध्ये आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू करणारा प्रतिभाशाली अष्टपैलू पवन नेगी याने अंतिम संघात निवड झाल्याबाबत आनंद व्यक्त करताना सामन्याआधी थोडा घाबरलो होतो; परंतु कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या प्रोत्साहनामुळे आपल्यावरील दबाव कमी झाल्याचे सांगितले. आपल्या पदार्पणीय सामन्यात १६ धावा देऊन एक गडी बाद करणाऱ्या नेगीने म्हटले, ‘गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मला मी सामना खेळत असल्याचे दुपारी कळविले. तेव्हा मी खूप आनंदित होतो; परंतु आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याआधी मी थोडा घाबरलो होतो. कोणत्याही खेळाडूसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब असते. मैदानावर उतरण्याआधी माझ्यावर दबाव नव्हता; परंतु स्टेडियममध्ये प्रवेश करताच मी थोडा घाबरलो होतो. कर्णधार धोनीने मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे माझ्यावरील दडपण हळूहळू कमी झाले होते. मी माझा पहिलाच सामना खेळत होतो आणि हा माझ्यासाठी भावनिक क्षण होता.’’ तो म्हणाला, ‘‘रवी शास्त्री यांनी मला कॅप दिली तो क्षण माझ्यासाठी सन्मानजनक होता. संघातील सर्व सहकारी खेळाडूंनी माझ्याजवळ येऊन माझे अभिनंदन केले. माझ्यासाठी हा विशेष अनुभव होता.’’
> कर्णधाराकडून धवनची पाठराखण
आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यासाठी संघर्ष करीत असलेला स्टार सलामीवीर शिखर धवनची कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पाठराखण केली आहे. धवन चांगला फलंदाज असल्याचे सांगताना धोनीने त्याला खेळपट्टीवर तळ ठोकण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय संघाने आशिया कप टी-२० स्पर्धेत आपली विजयी मोहीम कायम राखताना गुरुवारी संयुक्त अरब अमिरात संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला आणि स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. फलंदाजीसाठी अनुकूल नसलेल्या खेळपट्टीवर भारतीय संघाने ‘मॅन आॅफ द मॅच’ रोहित शर्माच्या (३९) नेतृत्वाखालील चमकदार कामगिरी करीत शानदार विजय मिळवला. या लढतीत धवनने संघर्षपूर्ण फलंदाजी करताना नाबाद १६ धावांचे योगदान दिले. धोनीने धवनच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. धोनी म्हणाला, ‘धवन चांगला खेळाडू आहे. त्याने खेळपट्टीवर तळ ठोकताना सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याला पूर्वीप्रमाणे फलंदाजी करताना बघणे सुखावह होते. खेळपट्टीवर तळ ठोकून फलंदाजी करणे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. त्यात यशस्वी ठरल्यामुळे मला आनंद झाला.’