सांगली : दंगा करतो म्हणून मिरजेत विद्यार्थ्यास मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:17 IST2023-04-01T12:16:41+5:302023-04-01T12:17:07+5:30
पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थास शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची तक्रार मुलाच्या पालकांनी मिरज शहर पोलिसात केली आहे.

सांगली : दंगा करतो म्हणून मिरजेत विद्यार्थ्यास मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा
मिरज : मिरजेतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दंगा-मस्ती करतो म्हणून पहिलीतील विद्यार्थ्यास शिक्षिकेने बेदम मारहाण केली. याबाबत शिक्षिकेवर मिरज शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरजेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थास शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची तक्रार त्या मुलाच्या पालकांनी मिरज शहर पोलिसात केली आहे. पीडित मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याच्या अंगावर पट्टीने मारलेले व्रण, डोळ्याला सूज आली होती. विद्यार्थ्याला घरच्यांनी विचारल्यावर पीडित विद्यार्थ्याने वंदना नामक शिक्षिकेने मारहाण केल्याचे सांगितले.
पालकांनी शाळेत जाऊन याबाबत विचारणा केल्यावर शाळेत मुलांमध्ये पेपर ओढाओढीमुळे वाद झाला. तुमचा मुलगा शाळेत दंगा-मस्ती करत असल्याने त्याला शिक्षा केल्याचे शिक्षिकेने सांगितल्याने संतप्त पालकांनी मिरज पोलीस ठाण्यात धाव घेत न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षिकेविरुद्ध मारहाणीची तक्रार दाखल केली. याबाबत मिरज शहर पोलिसांनी शिक्षिका वंदना यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.