सानिया बनली नंबर वन!
By admin | Published: April 13, 2015 03:52 AM2015-04-13T03:52:04+5:302015-04-13T11:36:59+5:30
भारताची अव्वल टेनिसतारका सानिया मिर्झा रविवारी दुहेरीच्या रँकिंगमधील नंबर वन खेळाडू बनली आहे. अशी किमया साधणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली
चार्ल्सटन : भारताची अव्वल टेनिसतारका सानिया मिर्झा रविवारी दुहेरीच्या रँकिंगमधील नंबर वन खेळाडू बनली आहे. अशी किमया साधणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली. सानिया मिर्झाने आज स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने येथे डब्लूटीए फॅमिली सर्कल कप स्पर्धा जिंकली.
सानियाआधी भारताचा लिएंडर पेस आणि महेश भूपती हेच दुहेरीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहेत. सानिया ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडूदेखील आहे. हिंगीससोबत सानियाचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. हे दोन खेळाडू मार्चमध्ये प्रथम एकत्रित खेळले. त्यानंतर या जोडीने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. त्यांनी इंडियन वेल्समध्ये पहिली स्पर्धा जिंकली आणि नंतर मियामी येथेही अजिंक्यपद पटकावले. या जोडीने १४ सामन्यांत तीन सेट गमावले आहेत. या हंगामाच्या अखेरीस रेस टू सिंगापूरमध्ये ही जोडी अव्वल बनली. यात दुहेरीच्या अव्वल आठ जोड्या खेळणार आहेत. सानिया आणि हिंगीस जोडीने पहिला सेट अवघ्या २२ मिनिटांत जिंकला. दुसऱ्या सेटमधील पहिल्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस भेदली गेली; परंतु त्यांनी लगेच मुसंडी मारली. दुसऱ्या सेटच्या पाचव्या गेममध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांनी मुसंडी मारण्याची संधी गमावली. तथापि, त्यांनी अंतर कमी केले; परंतु सानिया आणि हिंगीस जोडीने १0 व्या गेममध्ये त्यांची सर्व्हिस भेदताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने सेसी डेल्लाका आणि डारिजा जुराक यांचा एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात ६-0, ६-४ असा पराभव केला. सानियाला या विजयामुळे ४७0 गुण मिळाले. त्यामुळे तिचे एकूण ७,९६५ गुण झाले आहेत. तिने इटलीची सारा इराणी (७,६४0) आणि रॉबर्टा विंची (७,६४0) यांना मागे टाकले. अधिकृत रँकिंग उद्या जाहीर होणार आहे. (वृत्तसंस्था)