सानिया, काराला अजिंक्यपद
By admin | Published: October 27, 2014 02:00 AM2014-10-27T02:00:29+5:302014-10-27T02:00:29+5:30
स्पर्धेत तृतीय मानांकन प्राप्त सानिया आणि कारा यांनी द्वितीय मानांकित प्रतिस्पर्धी जोडीवर ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या दुहेरी लढतीत ६-१, ६-० अशी सरशी साधली़
सिंगापूर : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह खेळताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या अंतिम फेरीत चीनची पेंग शुआई आणि चिनी तैपेईच्या सीह सू वेई या जोडीवर शानदार विजय मिळवून अजिंक्यपदाचा मान मिळविला़
स्पर्धेत तृतीय मानांकन प्राप्त सानिया आणि कारा यांनी द्वितीय मानांकित प्रतिस्पर्धी जोडीवर ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या दुहेरी लढतीत ६-१, ६-० अशी सरशी साधली़ विशेष म्हणजे सानिया आणि कारा या जोडीचा हा अखेरचा किताब ठरला आहे़ कारण यानंतर या दोन्ही खेळाडू दुहेरीत वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळणार आहेत़
भारताच्या सानियाने पहिल्यांदाच डब्ल्यूटीए फायनल्सला पात्रता मिळविली होती़ तिने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करताना या वर्षाचा शानदार समारोप केला़ युएस ओपनच्या मिश्र दुहेरीचा किताब आपल्या नावे करणाऱ्या सानिया आणि कारा यांना स्पर्धेच्या उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत सुपर टायब्रेकपर्यंत झुंजावे लागले होते; मात्र फायनलमध्ये या जोडीने चमत्कारिक खेळ करीत सामन्यात बाजी मारली़
सानिया आणि कारा यांनी गत चॅम्पियन चीन आणि चिनी तैपेईच्या खेळाडूंची सामन्यात ६ वेळा सर्व्हिस भेदली़ संपूर्ण सामन्यात भारत आणि झिम्बाब्वेच्या खेळाडूंचा दबदबा राहिला़ प्रतिस्पर्धी खेळाडूंना या लढतीत तोंड वर करण्याची संधीच मिळाली नाही़
सानियाचा डब्ल्यूटीए फायनल्समधील हा पहिलाच किताब आहे़ दुसरीकडे ११ व्यांदा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या काराचे स्पर्धेतील हे तिसरे अजिंक्यपद आहे़ काराने येथे २००० ते २००९ पर्यंत सलग सहभाग नोंदविला होता़ तिने यापूर्वी २००७ आणि २००८ मध्ये स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते़
स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यामुळे सानिया आणि कारा यांना मार्टिना नवरातिलोव्हा हिच्या नावावर ठेवण्यात आलेली ट्रॉफी प्रदान करण्यात आली़ या जोडीचा १३ महिन्यांतील ५ वा किताब आहे़ दुसरीकडे यावर्षी २४-९ अशी विक्रमी कामगिरी करणाऱ्या वेई आणि शुआई यांना सत्रातील चौथा किताब आपल्या नावे करता आला नाही़ यापूर्वी त्यांनी दोहा, इंडियन्स वेल्स आणि फ्रेंच ओपनमध्ये दुहेरीचे जेतेपद मिळविले होते़ त्यामुळे या जोडीला डब्ल्यूटीए फायनल्सच्या जेतेपदाचे दावेदार मानले जात होते; मात्र ही जोडी फायनलमध्ये भारत आणि झिम्बाब्वेजोडीपुढे काहीच करू शकली नाही़ (वृत्तसंस्था)