सानिया-हिंगीस अजिंक्य

By Admin | Published: November 2, 2015 12:22 AM2015-11-02T00:22:17+5:302015-11-02T00:22:17+5:30

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने दुहेरीतील वर्चस्व कायम राखताना रविवारी अंतिम लढतीत सहज विजयाची नोंद केली

Sania-Hingis Ajinkya | सानिया-हिंगीस अजिंक्य

सानिया-हिंगीस अजिंक्य

googlenewsNext

सिंगापूर : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व तिची स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने दुहेरीतील वर्चस्व कायम राखताना रविवारी अंतिम लढतीत सहज विजयाची नोंद केली आणि डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद पटकावले. यंदाच्या मोसमातील या जोडीचे हे एकूण नववे विजतेपद आहे.
२०१५ मध्ये दुहेरीतील सर्वोत्तम जोडी म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर ४८ तासांनी सानिया-हिंगीस जोडीने अंतिम लढतीत गार्बाइन मुरुगुजा व कार्ला सुआरेज नवारो या आठव्या मानांकित जोडीचा ६६ मिनिट रंगलेल्या लढतीत ६-०, ६-३ ने पराभव केला. या विजेतेपदासह सानिया-हिंगीस जोडीने दुहेरीतील वर्चस्व कायम राखले.
सानिया-हिंगीस जोडीने सलग २२ वा विजय नोंदवला. गेल्या सहा स्पर्धांमध्ये या जोडीने एकही लढत गमावलेली नाही. सिनसिनाटीमध्ये चान हाओ चिंग व चान युंग जान यांच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर या जोडीने आजतागायत केवळ दोन सेट गमावले.
सानिया-मार्टिना जोडीने मुुरुगुजा आणि सुआरेज नवारो यांच्याविरुद्ध आज सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटच्या दुसऱ्या गेममध्ये सानियाने जोरकस फोरहँडच्या जोरावर मुरुगुजाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर सानिया-मार्टिना जोडीने आपल्या पद्धतीने खेळाची सूत्रे हलवली.
सानियाने बॅकहँडच्या फटक्यावर गुण वसूल करीत पहिला सेट जिंकला. स्पॅनिश जोडीने दुसऱ्या सेटमध्ये संघर्षपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न केला. पण, सानिया-मार्टिना जोडीला ब्रेक पॉइंट घेण्यापासून व जेतेपद पटकावण्यापासून रोखण्यात त्यांना यश आले नाही. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना हिंगीसने विजयाचे श्रेय सानियाला दिले. सानिया सध्या महिला दुहेरीत अव्वल खेळाडू आहे. हिंगीस म्हणाली, की हा एक चांगला दिवस होता. सानियाने शानदार
खेळ केला. तिने कोर्टवर वर्चस्व गाजवले. तिचा प्रत्येक फटका शानदार होता.(वृत्तसंस्था)
या दोन्ही खेळाडूंचे यंदाच्या वर्षातील नववे विजेतेपद आहे. त्यांनी यंदा यापूर्वी इंडियन वेल्स, मियामी, चार्ल्सटन, विम्बल्डन, यूएस ओपन, ग्वांग्झू, वूहान आणि बीजिंगमध्ये जेतेपद पटकावण्याची कामगिरी केली.
मार्च महिन्यापासून सानिया-हिंगीस जोडीने १० स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारली. त्यात केवळ त्यांना रोम ओपनमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
सानिया डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखण्यात यशस्वी ठरली. गेल्या वर्षी झिम्बाब्वेची कॅरा ब्लॅकच्या साथीने सानियाने जेतेपद पटकावले होते.
हिंगीसने कारकीर्दीत दुहेरीतील ५० वे जेतेपद पटकावले. तिने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. यापूर्वी १९९९ व २००० मध्ये हिंगीसने जेतेपद पटकावले होते.
सानिया व हिंगीस या जोडीने या स्पर्धेत एकही सेट न गमावता सहज जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला.
डब्ल्यूटीए दुहेरीमध्ये ५० जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारी हिंगीस जगातील १६ वी खेळाडू ठरली आहे.
यापूर्वी मार्टिना नवरातिलोव्हा, रोसी कासेल्स, पाम श्राइवर, बिली जीन किंग, नताशा जेवेरेव्हा, लिसा रेमंड, याना नोवोत्ना, अरांत्सा सांचेज विकारियो, गिगी फर्नांडिस, हेलेना सुकोव्हा, लारिसा नीलँड, कारा ब्लॅक, रेनी स्टब्स, वेंडी टर्नबुल आणि लीजर ह्युबर यांनी ही कामगिरी केली आहे.

Web Title: Sania-Hingis Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.