सानिया-हिंगीसचा दबदबा कायम
By admin | Published: January 16, 2016 01:09 AM2016-01-16T01:09:11+5:302016-01-16T01:09:11+5:30
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा सिध्द करताना डब्ल्यूटीए सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.
सिडनी : सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस या दुहेरी जोडीने टेनिस विश्वातील आपला दबदबा सिध्द करताना डब्ल्यूटीए सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या या जोडीने या वर्षातील सलग दुसरे विजेतेपद मिळवले. विशेष म्हणजे यासह सानिया - हिंगीस यांनी सलग ३० सामने जिंकण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला.
स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कडवी झुंज मिळाल्यानंतर विजेतेपदासाठीही सानिया - हिंगीस यांना घाम गाळावा लागला. कॅरोलिन गर्सिया - ख्रिस्टीना मालडेनोविच यांनी लढवय्या खेळ करताना बलाढ्य इंडो - स्विस जोडीला तीन सेटपर्यंत झुंजवले. एक तास १३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात पहिला सेट ६-१ जिंकून गर्सिया - ख्रिस्टीना यांनी आश्चर्यकारक आघाडी घेतली.
पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर सानिया - हिंगीस यांच्याकडून जबरदस्त पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या सेटमध्येही ही जोडी १-४ अशी पिछाडीवर पडली. मात्र येथून सानिया - हिंगीस यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कोणतेही दडपण न घेता ५-५ अशी शानदार बरोबरी केली. यानंतर हा सेट टायब्रेकमध्ये नेत त्यांनी गर्सिया - ख्रिस्टीना यांच्यावर दबाव आणला.
यावेळी सानिया - हिंगीस या चॅम्पियन जोडीने निर्णायक सुपर टायब्रेकमध्ये ८-३ अशी बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तर तिसऱ्या सेटमध्ये सानिया - हिंगीस यांनी दीर्घ अनुभवाच्या जोरावर सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला आणि गर्सिया - ख्रिस्टीना यांचे कडवे आव्हान परतावले आणि १-६, ७-५, १०-५ असा चमकदार विजय मिळवत आपली विजयी घोडदौड ३० सामन्यांवर नेली. (वृत्तसंस्था)
बोपन्ना, मेर्जियाची फायनलमध्ये धडक
भारताचा पुरुष दुहेरीतील स्टार रोहन बोपन्नाने रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियासह सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. विजेतेपदासाठी या जोडीसमोर जेमी मरे आणि ब्रुनो सोरेस यांचे आव्हान असेल.
उपांत्य फेरीत या बोपन्ना - मेर्जिया यांनी थॉमस बलुची आणि लियोनार्डो मेयर यांच्यावर ७-६, ६-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली.
अन्य उपांत्य लढतीत मरे आणि सोरेस यांनी आपला विजयी धडाका कायम राखताना पोलंडच्या लुकास कुबोट आणि मार्सिन मात्कोवस्की यांचा ७-५, २-६, १०-३ असा पाडाव करुन फायनलमध्ये प्रवेश केला. दरम्यान, बोपन्नाने गतवर्षी कॅनडाच्या डॅनियल नेस्टरसह खेळताना दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. त्यामुळे रोहनच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.