सानिया-हिंगीस अंतिम फेरीत

By admin | Published: January 28, 2016 01:48 AM2016-01-28T01:48:07+5:302016-01-28T01:48:07+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना जर्मनीच्या ज्युलिया आणि झेक प्रजासत्ताकाच्या

Sania-Hingis in finals | सानिया-हिंगीस अंतिम फेरीत

सानिया-हिंगीस अंतिम फेरीत

Next

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना जर्मनीच्या ज्युलिया आणि झेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवा यांचा बुधवारी ६-१, ६-० असा धुव्वा उडवताना अंतिम फेरीत धडक मारली. दरम्यान, ब्रिटनसाठी वर्षातील पहिल्याच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील बुधवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. त्या जागतिक क्रमवारीतील नंबर दोनचा खेळाडू अँडी मरे आणि जोहाना कोंता यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
सानिया-हिंगीस ही अव्वल मानांकित जोडी आता सलग तिसऱ्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून फक्त एक पाऊल दूर आहे. सानिया-हिंगीस जोडीने उपांत्य फेरीतील एकतर्फी लढत फक्त ५४ मिनिटांत जिंकली. त्यांनी पहिला सेट २६ मिनिटांत व दुसरा सेट २८ मिनिटांत जिंकला. सानिया-हिंगीस यांचा हा सलग ३५वा विजय आहे. गतवर्षी विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या विजेतेपदासह ९ अजिंक्यपदे पटकावणाऱ्या या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जिस आणि झेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोवा या १३व्या मानांकित जोडीला ६-१, ६-० अशी धूळ चारली. भारतीय-स्वीस जोडीला ८ वेळा सर्व्हिस भेदण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी ५ वेळा यश मिळवले, तर जॉर्जिस आणि प्लिसकोव्हा यांना चारपैकी एकदाही यश मिळाले नाही.
दरम्यान, द्वितीय मानांकित मरे याने आठव्या मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररला ३ तास २० मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण उपांत्यपूर्व फेरीत ६-३, ६-७, ६-२, ६-३ असे पराभूत करून सहाव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरी गाठली.
मरेची उपांत्य फेरीतील लढत १३व्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी होईल. राओनिक याने अन्य एका उपांत्यपूर्व फेरीत २३व्या मानांकित फ्रान्सच्या गायेल मोंफिल्सचा २ तास १७ मिनिटांच्या लढतीत ६-३, ३६, ६-३, ६-४ असा पराभव केला. राओनिक प्रथमच आॅस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला असून, अशी कामगिरी करणारा तो कॅनडाचा पहिला खेळाडू बनला आहे.
त्याआधी महिला एकेरीत ब्रिटनच्याच कोंताने चीनच्या शुआई झांग हिचा ६-४, ६-१ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. १९७७ नंतर ब्रिटनचे महिला आणि पुरुष खेळाडू एकेरीत अंतिम चारमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
कोंताची उपांत्य फेरीतील लढत जर्मनीच्या सातव्या मानांकित एंजेलिक केर्बर हिच्याविरुद्ध होईल. केर्बरने दोन वेळची चॅम्पियन बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाचे आव्हान
६-३, ७-५, असे मोडीत काढून
उपांत्य फेरी गाठली. ब्रिटनसाठी वर्जिनिया वेडने १९७२ साली या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते, तर बार्करने १९७५ व १९७७ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis in finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.