सानिया-हिंगीसची घोडदौड
By Admin | Published: April 2, 2015 01:35 AM2015-04-02T01:35:51+5:302015-04-02T01:35:51+5:30
गेल्या महिन्यात परीबस ओपनचे विजेतेपद जिंकणारी भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या
मियामी : गेल्या महिन्यात परीबस ओपनचे विजेतेपद जिंकणारी भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या जोडीने मियामी ओपनच्या महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. दरम्यान, पुरुष गटात एका सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही जबरदस्त मुसंडी मारताना जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने उपांत्यपूर्व फेरी गाठली.
महिला दुहेरीत अव्वल मानांकित जोडी सानिया आणि हिंगीस यांनी अनास्तासिया आणि एरिना रोडियोनोव्हा या जोडीचा ६-३, ६-४ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्यांची लढत सातव्या मानांकित हंगेरीच्या टिमियो बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टिना म्लादेनोविच जोडीशी होईल.
दरम्यान, जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविचने एका सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही जोरदार मुसंडी मारताना यूक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोव्हचा ६-७, ७-५, ६-० असा पराभव करीत मियामी ओपनमधील उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
जोकोविचची पुढील फेरीतील लढत आता स्पेनचा सहावा मानांकित डेव्हिड फेररशी होईल. फेररने फ्रान्सच्या जाइल्स सिमोनचा ७-६, ६-० असा पराभव केला.
अन्य लढतींत ब्रिटनच्या तृतीय मानांकित अँडी मरेने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचा ६-४, ३-६, ६-३ असा पराभव करताना कारकिर्दीतील ५०० वा विजय मिळवला.
आता त्याची लढत आॅस्ट्रियाच्या डोमिनिक थियेम याच्याशी होईल. डोमेनिकने फ्रान्सच्या अॅड्रियन मानारिनोलाचा ७-६, ४-६, ७-५ असा पराभव केला. रॅफेल नदालला धूळ चारणाऱ्या जपानच्या चौथ्या मानांकित केई निशीकोरीने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा ६-१, ६-२ असा पराभव केला.
आता त्याची लढत अमेरिकेच्या जॉन इसनेरशी होईल. इसनेरने कॅनडाच्या मिलोस राओनिच याच्यावर ६-७, ७-६, ७-६ असा विजय मिळवला. झेक प्रजासत्ताकच्या थॉमस बर्डीचची लढत उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन मोनाका याच्याशी होईल.
महिला गटात स्पेनच्या १२ व्या मानांकित कार्ला सुआरेज नवारो याने तीन वेळची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा ०-६, ६-१, ७-५ असा पराभव केला. ती उपांत्य फेरीत जर्मनीच्या नवव्या मानांकित आंद्रिया पेत्कोविचशी दोन हात करील. आंद्रियाने झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हावर ६-४, ६-२ अशी मात केली. (वृत्तसंस्था)