सानिया-हिंगीस ठरल्या 'डबल्स वर्ल्ड चॅम्पियन्स'
By admin | Published: December 23, 2015 09:47 AM2015-12-23T09:47:30+5:302015-12-23T09:51:49+5:30
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताबाने गौरवले आहे
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २३ - भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताब देऊन गौरवले आहे. सानिया - हिंगीस जोडीने या वर्षात टेनिसच्या महिला दुहेरी स्पर्धेवर अक्षरश: राज्य केले आहे. यापूर्वी भारताचे लिअँडर पेस-महेश भूपती यांनी १९९९ साली पुरष दुहेरीत 'वर्ल्ड चॅम्पियन'चा खिताब मिळवला होता.
मार्च २०१५ मध्ये एकत्र आलेल्या सानिया व हिंगीस या जोडीने यावर्षी नऊ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात विम्बल्डन व अमेरिक ओपन या ग्रँड स्लॅम स्पर्धांसह डब्ल्यूटीए टूर फायनल्सच्या विजेतेपदाचाही समावेश आहे. यावर्षी त्यांनी एकूण ५५ सामने जिंकले असून गेल्या २२ सान्यांपासून दुहेरीची ही जोडी अपराजित आहे, त्यांना अवघ्या ७ सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यांच्या या नेत्रदीपक व शानदार कामगिरीमुळेच त्या दोघींनाही 'वर्ल्ड चॅम्पियन्स'चा खिताब देण्यात आला आहे.
मला व मार्टिनाला आटीएफकडून मिळालेला मोठा सन्मान आहे. एकत्र खेळायला लागल्यावर अवघ्या कमी कालावधीत हा बहुमान मिळवला हे अतुलनीय असून या प्रवासात ज्यांनी मला मदत केली त्यांची मी आभारी आहे.
दरम्यान आयटीएफच्या महिला एकेरीत वर्ल्ड चॅम्पियन म्हणून 'सेरेना विल्यम्स' तर पुरूष एकेरीत 'नोव्हाक जोकोविचला' हा सन्मान देऊन गौरवण्यात आले.