सानिया-हिंगीसला विजेतेपद
By admin | Published: September 27, 2015 12:12 AM2015-09-27T00:12:02+5:302015-09-27T00:12:02+5:30
विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन
ग्वांग्झू : विम्बल्डन आणि यूएस चॅम्पियन जोडी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करताना शनिवारी येथे ग्वांग्झू ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीने यजमान चीनच्या शिलिन शू आणि शियोदी यू या बिगरमानांकित जोडीचा ६-३, ६-१ अशा सलग सेट्समध्ये पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ग्वांग्झू इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालेल्या एकतर्फी लढतीत भारतीय-स्वीस जोडीने अवघ्या ५८ मिनिटांत अंतिम सामना जिंकला.
या वर्षी सलग दोन ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावणाऱ्या जागतिक क्रमवारीतील महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया आणि हिंगीस यांनी सर्व्हिसवर ७० टक्के आणि दुसऱ्या सर्व्हिसवर ६४ टक्के गुण घेतले. तसेच, शानदार कामगिरी करताना ६ पैकी ५ ब्रेक पॉइंट वाचवले. प्रतिस्पर्धी चीनच्या जोडीने सामन्यात एकदा दुहेरी चूक केली आणि सातपैकी दोनदाच ते ब्रेक गुण वाचवू शकले. त्याआधी भारतीय-स्वीस जोडीला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता, तर उपांत्य फेरीत त्यांनी इस्राईलच्या ज्युलिया ग्लुशेंको व स्वीडनच्या रेबेका पीटरसन या जोडीला नमवले होते. (वृत्तसंस्था)