सानियाला ‘खेलरत्न’!
By admin | Published: August 30, 2015 02:31 AM2015-08-30T02:31:36+5:302015-08-30T02:31:36+5:30
टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला शनिवारी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सोहळ्यात देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ने सन्मानित करण्यात
नवी दिल्ली : टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला शनिवारी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सोहळ्यात देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी टाळ्यांच्या प्रचंड गजरात सानियाला पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख प्रदान केले. तसेच महाराष्ट्राची कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला यावेळी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
अभिलाषासह एकूण १७ खेळाडूंचा राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्काराने गौरव केला. सानिया नारंगी रंगाची साडी आणि निळे ब्लेझर घालून आली होती. दरबार हॉलमध्ये अनेक गणमान्य नागरिक आणि क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अतिविशिष्ट व्यक्तींच्या साक्षीने तिने हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा टाळ्यांचा अक्षरश: पाऊस पडला. लिएंडर पेसनंतर खेलरत्नने गौरवान्वित झालेली सानिया दुसरी टेनिसपटू आहे. सानियाच्या खेलरत्नवर हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतरही हा पुरस्कार तिला देण्यात आला हे विशेष. सोमवारपासून सुरू होत असलेल्या अमेरिकन ओपनपूर्वी सानिया अमेरिकेतून हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारतात आली होती.
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या मराठमोळ्या अभिलाषाला यावेळी अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. रोहित शर्मा, बॉक्सर मनदीप जांगडा आणि धावपटू एम. आर. पूवम्मा हे उपस्थित नव्हते. निवृत्त न्या. व्ही. के. बाली यांच्या निवड समितीने अर्जुन पुरस्कारासाठी १७ जणांची शिफारस केली होती. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना अर्जुनाची प्रतिमा, प्रमाणपत्र आणि प्रत्येकी पाच लाख रुपये रोख देण्यात आले. यंदाचे पुरस्कारदेखील वादग्रस्त ठरले. सानियाच्या खेलरत्नला पॅराआॅलिम्पिकपटू गिरीशाने तर अनुप कुमारच्या द्रोणाचार्यला कुस्ती कोच विनोद कुमार यांनी आव्हान दिले.
पुरस्कार विजेते
राजीव गांधी खेलरत्न : सानिया मिर्झा (टेनिस)
अर्जुन पुरस्कार : पी आर. श्रीजेश (हॉकी), दीपा करमाकर (जिम्नॅस्टिक), जीतू रॉय (नेमबाजी), संदीप कुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन ), स्वर्णसिंग विर्क (कुस्ती), सतीश शिवालिंगम (वेटलिफ्टिंग), सांतोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासिलिंग) एम. आर. पूवम्मा (अॅथलेटिक्स), मनजीत चिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी), अनूपकुमार यामा (स्केटिंग)
द्रोणाचार्य पुरस्कार ... नवल सिंग : पॅरा अॅथलेटिक्स, अनुपसिंग : (कुस्ती), हरबंससिंग (अॅथलेटिक्स आजन्म), स्वतंत्रराज सिंग : बॉक्सिंग आजन्म, निहार अमीन जलतरण आजन्म. ध्यानचंद पुरस्कार : रोमियो जेम्स : (हॉकी), शिवप्रकाश मिश्रा (टेनिस), टीपीपी नायर (व्हॉलीबॉल)