स्थगिती बाजूला ठेवत सानियाला ‘खेलरत्न’
By Admin | Published: August 30, 2015 02:29 AM2015-08-30T02:29:46+5:302015-08-30T02:29:46+5:30
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्टार महिला टेनिस
क्रीडा मंत्रालय ठाम : कोर्टात निवडीचे समर्थन करणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या स्टार महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाला राजीव गांधी ‘खेलरत्न’ हा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दखल घेण्याची बाब म्हणजे कर्नाटक उच्च न्यायालयाने या सर्वोच्च पुरस्कारासाठी स्थगितीचा निर्णय दिल्यानंतरही सानियाला पुरस्कार देण्यात आला. त्याचवेळी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यावेळी सानियाच्या पुरस्काराचे समर्थन करताना आगामी १५ दिवसांत आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतल्याचे कळाले.
रौप्यपदक विजेता पॅरॉलिम्पियन अॅथलिट एच. एन. गिरीशने यंदाच्या ‘खेलरत्न’ विरोधात कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये याचिका देत आपण या पुरस्कारासाठी पात्र असल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाने पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी स्थगितीचा निर्णय देत गिरीशला दिलासा, तर क्रीडा मंत्रालयाला धक्का दिला होता. मात्र यानंतरही क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारांमध्ये बदल न करण्याचा निर्णय घेत सानियाला ‘खेलरत्न’ने गौरवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा मंत्रालयाकडे आपली बाजू मांडण्यास अजूनही १५ दिवसांची मुदत असून, या कालावधीत क्रीडा मंत्रालय सर्व पुराव्यांनिशी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला उत्तर देणार असल्याची माहिती मिळाली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)