‘लकी गर्ल’ हिंगीससोबत सानिया, पेस फायनलमध्ये
By admin | Published: September 11, 2015 04:32 AM2015-09-11T04:32:11+5:302015-09-11T04:32:11+5:30
भारतीय खेळाडूंसाठी ‘लकी गर्ल’ ठरलेली स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन
न्यूयॉर्क : भारतीय खेळाडूंसाठी ‘लकी गर्ल’ ठरलेली स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन टेनिसची गुरुवारी अंतिम फेरी गाठली.
सानिया-हिंगीस या अव्वल जोडीने उपांत्य फेरीत इटलीची सारा इराणी-फ्लाव्हिया पेनेटा या ११व्या मानांकित जोडीचा सलग सेटमध्ये ६-४, ६-१ असा ७७ मिनिटांत पराभव केला. मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पेस-मार्टिनाने भारतीय खेळाडू रोहण बोपन्ना तसेच चायनिज-तैपेईची यंग जान चान यांच्यावर सलग सेटमध्ये ६-२, ७-५ने ६१ मिनिटांत विजय साजरा केला. हिंगीसने यंदा विम्बल्डनमध्ये पेससोबत मिश्र आणि सानियासोबत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. अमेरिकन ओपनमध्ये कामगिरीची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
सानिया-मार्टिना जोडीने उपांत्य लढतीत आत्मविश्वासासह खेळून एकही डबल फॉल्टची चूक केली नाही. या जोडीने पहिला सेट २१ आणि दुसरा सेट २८ मिनिटांत जिंकला. जेतेपदासाठी या जोडीला अमेरिकेची बेथानी माटेक सँड्स आणि सॅम क्वेरी या जोडीविरुद्ध खेळावे लागेल. बेथानी-सॅम यांनी पोलंडचा लुकास कोबोट आणि झेक प्रजासत्ताकाची आंद्रिया लावाकोवा यांचा सलग सेटमध्ये ६-४, ६-३ असा फडशा पाडला.
सानिया व पेस यांनी आपापल्या गटांत अंतिम
फेरी गाठली असताना बोपन्ना मात्र मिश्र दुहेरीपाठोपाठ पुरुष दुहेरीतही पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. बोपन्ना- फ्लोरिना मेर्जिया
यांना ब्रिटनचा डोमिनिक इंग्लोत व स्वीडनचा रॉबर्ट लिडस्टेड या बिगरमानांकित जोडीकडून ८० मिनिटांत ६-७, ३-६ पराभवाचा धक्का बसला. पेस पुरुष दुहेरीत आणि सानिया मिश्र दुहेरीत आधीच पराभूत झाले आहेत.