सानिया-मार्टिनाला अजिंक्यपद
By admin | Published: April 7, 2015 04:10 AM2015-04-07T04:10:35+5:302015-04-07T04:10:35+5:30
सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची आपली साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने स्वप्नवत सुरुवात कायम ठेवताना रविवारी येथे मियामी ओपन
मियामी : सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची आपली साथीदार मार्टिना हिंगीस हिच्या साथीने स्वप्नवत सुरुवात कायम ठेवताना रविवारी येथे मियामी ओपन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तिचे हे कारकीर्दीतील २५ वे डब्लूटीए दुहेरीचे विजेतेपद आहे. सानिया आणि हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने अडखळत्या सुरुवातीनंतर एकटेरिना मकारोव्हा आणि इलेना वेस्नीना या द्वितीय मानांकित रशियन जोडीला ७-५, ६-१ असे नमवले.
सानिया आणि हिंगीस पहिल्या सेटमध्ये एक वेळ २-५ अशा पिछाडीवर होत्या; परंतु या जोडीने जोरदार मुसंडी मारताना सलग आठ गेम जिंकताना पहिला गेम जिंकला. या दोघींनी इंडियन वेल्सच्या रूपाने पहिले विजेतेपद पटकावताना याच रशियन जोडीला धूळ चारली होती. ही जोडी एकत्र आली तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत एकही सेट गमावला नाही. हिंगीसने विजयाचे श्रेय सामन्यादरम्यान सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांच्याकडून मिळालेल्या टिप्सला दिले. पिछाडीवर पडल्यानंतर आम्ही संधी शोधण्यावर लक्ष दिले. गेल्या आठवड्याप्रमाणेच प्रत्येक गुणावर लक्ष देत आम्ही आमची स्थिती बळकट केली.
या विजयाने सानिया आणि हिंगीस रोड टू सिंगापूर दुहेरीच्या तालिकेत नऊपैकी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. (वृत्तसंस्था)