सानिया मिर्झाची उपांत्य फेरीत धडक; पुरुष एकेरीत जोकोविच पाच सेटपर्यंत झुंजला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:11 AM2022-07-06T09:11:50+5:302022-07-06T09:12:05+5:30
सहाव्या मानांकित सानिया-मेट यांनी १ तास ४१ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामन्यात दाब्रोवस्की-पीयर्स यांचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला
लंडन : अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने क्रोएशियाच्या मेट पॅविकसोबत खेळताना विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली. तीन सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात सानिया-मेट यांनी गॅब्रिएला दाब्रोवस्की (कॅनडा) - जॉन पीयर्स (ऑस्ट्रेलिया) यांचा २-१ असा पराभव केला. दुसरीकडे पुरुष एकेरीत दिग्गज नोव्हाक जोकोविचने झुंजार खेळ करताना उपांत्य फेरी गाठली.
सहाव्या मानांकित सानिया-मेट यांनी १ तास ४१ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामन्यात दाब्रोवस्की-पीयर्स यांचा ६-४, ३-६, ७-५ असा पराभव केला. सानियाने अप्रतिम फटके मारताना मोलाचे योगदान दिले. मेट याने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर महत्त्वपूर्ण गुण मिळवले. दाब्रोवस्की-पीयर्स या चौथ्या मानांकित जोडीने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करताना सामना बरोबरीत आणला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये सानिया-मेट यांनी रॅलीज् खेळून दाब्रोवस्की-पीयर्स यांना चुका करण्यास भाग पाडले.
अव्वल मानांकीत जोकोविचला उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. इटलीच्या जेनिक सिन्नरने पहिले दोन सेट जिंकत शानदार आघाडी घेतली. परंतु, जोकोने नंतर सलग तीन सेट जिंकताना ५-७,२-६, ६-३, ६-२, ६-२ असा झुंजार विजय मिळवला.
राफाचा धडाका!
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने आपला धडाका कायम राखताना सरळ तीन सेटमध्ये बाजी मारत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. एकतर्फी झालेल्या सामन्यात नदालने नेदरलँड्सच्या बॉटिक वॅन डी झँडशुल्प याचा ६-४, ६-२, ७-६ (८-६) असा धुव्वा उडवला. तिसरा सेट टायब्रेकमध्ये नेत बॉटिकने थोडीफार झुंज दिली, पण अनुभवी नदालपुढे त्याची डाळ शिजली नाही. अन्य सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. अमेरिकेच्या ब्रँडन नकाशिमा याचे कडवे आव्हान ४-६, ६-४, ७-६ (७-२), ३-६, ६-२ असे परतावत किर्गियोसने विजयी आगेकूच केली.