सानिया नंबर वन; बोपण्णाही टॉप टेनमध्ये
By admin | Published: July 14, 2015 02:47 AM2015-07-14T02:47:25+5:302015-07-14T02:47:25+5:30
भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा हिने विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून डब्ल्यूटीए दुहेरीच्या रँकिंगमध्ये आपले नंबर वनचे स्थान अधिक
नवी दिल्ली : भारतीय टेनिसतारका सानिया मिर्झा हिने विम्बल्डनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून डब्ल्यूटीए दुहेरीच्या रँकिंगमध्ये आपले नंबर वनचे स्थान अधिक मजबूत केले आहे, तर रोहन बोपन्ना एटीपी दुहेरीच्या रँकिंगमध्ये जवळपास २० महिन्यांनंतर पुन्हा टॉप टेनमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला.
सोमदेव देववर्मन अमेरिकेत निल्सन प्रो टेनिस चॅम्पियनशिप जिंकल्यामुळे एटीपी एकेरीच्या रँकिंगमध्ये पुन्हा १५० खेळाडूंत पोहोचला आहे. त्याचबरोबर तो भारताचा एकेरीतील नंबर वन खेळाडूदेखील बनला आहे. सानियाने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने विम्बल्डन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून नवीन इतिहास घडवला. ही हैदराबादी खेळाडू याआधीच अव्वल स्थानावर होती; परंतु आता तिचे ९,५१० डब्ल्यूटीए गुण झाले आहेत. हिंगीस ८,८६५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. सानिया आणि हिंगीस जोडी रोड टु सिंगापूरच्या शर्यतीत आधीच अव्वल स्थानी होती; परंतु त्यांनी आता ५,८८६ गुणांसह आपली स्थिती आणखी बळकट केली आहे.
एटीपी दुहेरी रँकिंगमध्ये बोपन्नाने आठ क्रमांकांनी झेप घेतली असून, तो दहाव्या स्थानी पोहोचला आहे. बोपन्ना याआधी २८ आॅक्टोबर २०१३मध्ये अव्वल दहांमध्ये पोहोचला होता.
पेसने हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले असले, तरी तो पुरुष दुहेरीत कॅनडाचा त्याचा जोडीदार डॅनियल नेस्टरच्या साथीने अंतिम १६च्या पुढे जाऊ शकला नव्हता. त्यामुळे हा स्टार भारतीय खेळाडू ८ स्थानांनी घसरून ३२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. पेस आणि नेस्टर जोडी एटीपी रेस टू लंडनमध्ये २७व्या, तर बोपन्ना आणि मार्जिया सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.
भांबरीने ५ स्थानांनी झेप घेतली असून, तो १५१व्या, साकेत मयनेनी १९८व्या, विम्बल्डनमध्ये मुलांच्या गटात दुहेरीत विजेतेपद पटकावणारा सुमीत नागल एकेरीत ७४५व्या स्थानी पोहोचला आहे.(वृत्तसंस्था)