सलग दुस-या वर्षी सानिया ‘नंबर वन’
By admin | Published: October 31, 2016 07:14 PM2016-10-31T19:14:54+5:302016-10-31T19:14:54+5:30
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला डब्ल्यूटीए फायनल्समध्ये जेतेपद राखता आले नसले तरी सलग दुस-या वर्षी दुहेरीमध्ये अव्वल खेळाडू म्हणून वर्षाचा समारोप करणार आहे. सानिया व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीला डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस डब्ल्यूटीए स्पर्धेत सानियाला जेतेपद राखता आले नाही. पण ताज्या डब्ल्यूटीए क्रमवारीत मात्र तिने अव्वल स्थान कायम राखले आहे. क्रमवारीत
सलग दुस-या वर्षी महिला दुहेरीत अव्वल खेळाडू म्हणून ती वर्षाचा समारोप करणार आहे. गत चॅम्पियन सानिया-हिंगीस जोडीला उपांत्य फेरीत एकातेरिना माकारोव्हा व एलिना वेस्निना या जोडीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. सानियाच्या
नावावर ८१३५ मानांकन गुणांची नोंद आहे. तिची माजी सहकारी हिंगीस वर्षाचा शेवट चौथ्या स्थानावरील खेळाडू म्हणून करणार आहे. हिंगीस व सानिया संयुक्तपणे अव्वल स्थानी होत्या. पण अलीकडेच हिंगीसची क्रमवारीत घसरण झाली. दुस-या स्थानी फ्रान्सची कॅरोलिन गार्सिया व ख्रिस्टिना म्लोदेनोव्हिच आहेत. सानियाने टिष्ट्वटरवर अव्वल असल्याचा आनंद व्यक्त केला. सानिया म्हणाली, ‘सलग दुस-या वर्षी अव्वल स्थानी कायम राहणे सन्मानाची बाब आहे.’ सानियाने यंदा हिंगीसच्या साथीने आॅस्ट्रेलियन ओपन व बारबोरा स्ट्राइकोव्हाच्या साथीने सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत जेतेपद पटकावले. आॅगस्ट महिन्यात सानिया हिंगीसपासून वेगळी झाली आणि चेक प्रजासत्तकच्या बारबोरासोबत जोडी बनविली. पुरुष दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना २२ व्या स्थानी कायम आहे, तर लिएंडर पेसची एका स्थानाने घसरण झाली असून, तो ५६ व्या स्थानी आहे. पुरुष एकेरीत साकेत मिनेनीने १० स्थानांची प्रगती केली असून, तो १९३ व्या स्थानी आहे. अव्वल २०० खेळाडूंमध्ये तो भारताचा सर्वोत्तम मानांकन असलेला एकमेव
खेळाडू आहे.