चिमुकल्यांसाठी सानियाची टेनिस अकादमी
By Admin | Published: February 7, 2017 02:25 AM2017-02-07T02:25:55+5:302017-02-07T02:25:55+5:30
तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा खेळाचे धडे देणार आहे. ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’ नावाने सोमवारपासून ग्रासरूट लेव्हलवर प्रशिक्षण सुरू झाले.
हैदराबाद : तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा खेळाचे धडे देणार आहे. ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’ नावाने सोमवारपासून ग्रासरूट लेव्हलवर प्रशिक्षण सुरू झाले.
सानियाने २०१३मध्ये पहिली अकादमी लाँच केली. त्यानंतर हा दुसरा प्रयत्न आहे. तिची आई या अकादमीची प्रमुख असेल. टेनिसपटू म्हणून काय करावे, कुठे जावे, हे जाणून घेण्यासाठी मला लहानपणी फारच त्रास झाला. किती आणि कसा सराव करावा, हे सांगण्यासाठी कुणी नव्हते. यावर मात करण्यासाठी मी स्वत: लहान वयातील टेनिसपटूंना योग्य मार्गदर्शन करणार आहे, असे सानियाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सानिया पुढे म्हणाली, ‘‘ग्रासरूट लेव्हल अकादमी साकार करण्याचे श्रेय माझी आई आणि तिच्या मित्रांना जाते. टेनिसमध्ये लहान वयात मोठी स्पर्धा आहे. यावर मात करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते. वय वाढले, की प्रतिस्पर्धा आणखी कठीण होऊन बसते. यशस्वी खेळाडू बनायचे असेल, तर टेनिसला तीन-चार वर्षांपासून सुरुवात करायला हवी. चॅम्पियन्स, व्यावसायिक हे चार, पाच किंवा सहा वर्षांपासून करिअर सुरू करतात. ही अकादमी अडीच वर्षांपासून आठ वर्षांपर्यंतच्या टेनिसपटूंना घडविणार आहे.’’ (वृत्तसंस्था)