गोव्याच्या १४ वर्षीय संजना प्रभुगावकरचा युएईत विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 05:53 PM2021-05-25T17:53:15+5:302021-05-25T17:53:35+5:30
पणजी : गोव्याच्या १४ वर्षीय संजना प्रभुगावकर हिने युएईमध्ये झालेल्या एपेक्स फर्स्ट स्विमिंग ओपन चॅम्पियनशीपमध्ये ४ सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावित विक्रमी कामगिरी केली.
पणजी : गोव्याच्या १४ वर्षीय संजना प्रभुगावकर हिने युएईमध्ये झालेल्या एपेक्स फर्स्ट स्विमिंग ओपन चॅम्पियनशीपमध्ये ४ सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावित विक्रमी कामगिरी केली. तिने या स्पर्धेत पाच गटात भाग घेतला होता. ही स्पर्धा ९ ते १० एप्रिल रोजी हमदान स्विमिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाली. या स्पर्धेत संजनाने २०० मीटर वैयक्तिक मिडले गटात सुवर्ण, १०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर बॅकस्ट्रेक आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदक पटकाविले. फ्रिस्टाईलमध्ये पाचही प्रकारात संजनाने नवा विक्रम नोंदवला. संजना सध्या दुबई येथे पूर्णवेळ जलतरण प्रशिक्षण घेत आहे.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रदीप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ती तयार होत आहे. संजना ही सध्या ९ व्या वर्गात शिकत आहे. गेल्या ९ वर्षांपासून ती जलतरणाचा सराव करीत आहे. गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे आयोजित विविध स्पर्धांत तिने भाग घेतलेला आहे. तिने आतरराज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाही गाजविल्या आहेत.
दरम्यान, संजनाच्या या कामगिरीचे गोवा जलतरण संघटनेचे अध्यक्ष तसेच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी कौतुक केले आहेत. ते आपल्या संदेशात म्हणतात की, दुबईत नव्या विक्रमांना गवसणी घालणाऱ्या संजनाने गोव्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने चार सुवर्ण आणि एक राैप्यपदक पटकाविले आहे. तिच्या प्रशिक्षक आणि पालकांना शुभेच्छा.