दगडाला शिल्प बनवणारे संजय चव्हाण सर
By प्रसाद लाड | Published: February 18, 2019 06:47 PM2019-02-18T18:47:09+5:302019-02-18T18:50:17+5:30
मुंबई श्री स्पर्धा जिंकल्यावर बिलावाने आपले प्रशिक्षक संजय चव्हाण सर यांना मंचावर बोलावलं आणि आनंद साजरा केला.
मुंबई : दगडाला आकार दिल्याशिवाय त्याला मुर्तीचे रुप प्राप्त होत नाही. त्यासाठी त्या मुर्तीबरोबरच दगडाला आकार देणारे हातही महत्वाचे असतात. अनिल बिलावाने नवोदित श्री या स्पर्धेनंतर मुंबई श्रीमध्ये बाजी मारत इतिहास रचला. मुंबई श्री स्पर्धा जिंकल्यावर बिलावाने आपले प्रशिक्षक संजय चव्हाण सर यांना मंचावर बोलावलं आणि आनंद साजरा केला. आपल्यासारख्या ओबडधोबड दगडाला शिल्प बनवणाऱ्या चव्हाण सरांना बिलावा विजयानंतर विसरला नाही, हे साऱ्यांनी पाहिलं. बिलावाच्या ऐतिहासिक यशाबद्दल आम्ही त्याचे प्रशिक्षक संजय सर यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी बिलावाचा आतापर्यंतचा प्रवास संजय सरांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.
संजय सर बिलावाबद्दल म्हणाले की, "फक्त मजा-मस्ती करण्यासाठी बिलावा शरीर संपादन करत होता. त्याचं पोट पुढे होतं. त्याच्या मित्रांनी त्याला शरीरसौष्ठव होण्यासाठी प्रोत्साहित केलं. त्यानंतर त्याने गंभीरपणे यावर विचार केला. त्यानंतर त्याला एका व्यक्तीने सांगितलं की, तुला खरंच शरीरसौष्ठव क्षेत्रात नाव कमावायचं आहे, तर तुला संजय चव्हाण यांच्याकडे जायला हवं. त्याने मला फेसबूकवर विनंती पाठवली होती. पण मी जास्त फेसबूक पाहत नाही. त्यानंतर त्याने माझ्या विद्यार्थाकडून मोबाईल नंबर मिळवला आणि मला फोन केला. मला सांगितलं की, मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यानंतर 24 ऑगस्टला तो मला भेटायला आला. तेव्हा त्याला पाहिलं तेव्हा शरीरसौष्ठवासाठी लागेल अशी त्याची शरीरसंपदा नव्हती. पण त्याची मसल्स मॅच्युरिटी फार चांगली होती."
बिलावा आंतरराष्ट्रीय किर्तीचा शरीरसौष्ठव होईल...
तुला नक्की काय करायचंय, असं मी बिलावाला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, मला नवोदित मुंबई श्री स्पर्धा खेळायची आहे. पण नवोदितच्या कोणत्याही खाणाखूणा त्याच्या मसल्समध्ये दिसत नव्हत्या. कारण त्याचं 36 वय होतं. पण जन्माला आलाय शरीरसौष्ठवासाठीच, हे मला त्याची शरीरसंपदा पाहून समजलं. योगायोगाने तो माझ्याकडे आला आणि सारं काही स्वप्नवत झालं. एक इतिहास रचला गेला. बिलावाची मेहनत आणि आर्थिक गणिताची जुळवाजुळव यशस्वी झाली तर ही खेळाडू महाराष्ट्र श्रीमध्येही चमत्कार घडवू शकतो. येणाऱ्या एक-दोन वर्षात बिलावा आंतरराष्ट्रीय किर्तीचा शरीरसौष्ठव होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.