संजिता डोपिंग प्रकरणाची दखल घ्यावी, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांची विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 05:38 AM2018-06-04T05:38:27+5:302018-06-04T05:38:27+5:30
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती संजिता चानूसोबत जुळलेल्या डोप प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना केली आहे.
इम्फाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकविजेती संजिता चानूसोबत जुळलेल्या डोप प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांना केली आहे. मणिपूरच्या या भारोत्तोलनपटूच्या नमुन्याची ओळख पटविण्यात काहीतरी चूक झाली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या ५३ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या संजितावर आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई केली आहे. तिच्या अ नमुन्यामध्ये टेस्टोस्टेरोन स्टेरॉईडचे अंश आढळले.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात लिहिले की, ‘आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघाने १५ मे रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये संजिता चानूवर अस्थायी निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मला सांगण्यात आले आहे. प्रयोगशाळेमध्ये संजिताच्या नमुन्याची ओळख पटविताना काहीतरी चूक झाल्याचे मला सांगण्यात आले. माझ्यापुढे असलेल्या कागदपत्रामध्ये आयडब्ल्यूएफच्या पत्रामध्ये नमुन्याचा क्रमांक १५९९००० आहे, तर चौथ्या परिच्छेदामध्ये १५९९१७६ हा क्रमांक आहे. नमुन्याचे वेगवेगळे क्रमांक असल्यामुळे मला वाटते त्याच काहीतरी चूक झाली आहे. मी तुम्हाला या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करीत आहे.’ (वृत्तसंस्था)
- मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना पत्र लिहिले असून,त्यात अमेरिकेमध्ये गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या संजिताच्या डोप नमुन्यामध्ये काहीतरी गडबड झाली असून, हा नमुना बदलला असल्याचे म्हटले आहे.