हॅन्सी क्रोनिए सामनानिश्चिती प्रकरणी आरोपी संजीव चावला अटकेत
By admin | Published: September 15, 2016 08:10 AM2016-09-15T08:10:09+5:302016-09-15T08:10:09+5:30
सामना निश्चितीप्रकरणी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएला लाखो डॉलर्स देणारा आरोपी संजीव चावला याला लंडन पोलिसांनी अटक केली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - सामना निश्चितीप्रकरणी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएला लाखो डॉलर्स देणारा आरोपी संजीव चावला याला लंडन पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांपूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. लंडनमधील न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरु असून संजीव चावलाला भारताच्या हवाली करण्यास नकार देण्यात आला आहे.
संजीव चावलाविरोधात भारताने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं, ज्या आधारे भारत सरकारच्या माध्यमातून क्राईम ब्रांचने लंडन पोलिसांना संजीव चावलाला भारताच्या हवाली करण्याची मागणी केली होती अशी माहिती सह पोलीस आयुक्त रवींद्र चावला यांनी दिली आहे. यानंतर ब्रिटनकडून भारतीय परराष्ट्र खात्याला संजीव चावलाला 14 जूनला अटर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
संजीव चावलाच्या वकिलाने त्याला भारताच्या हवाली करण्यास नकार दिला असल्याची माहिती दिली आहे. संजीव चावलाने आपल्या प्रत्यार्पणास न्यायालयात आव्हान केलं आहे. दुस-या देशांमध्ये कारागृहातील असुविधा आणि सुरक्षेच्या मुद्यावर प्रत्यार्पणाला विरोधा केला जातो. भारतीय कारागृहांबद्दलची माहिती दिल्ली पोलिसांकडून यानिमित्ताने मागण्यात आली.
क्राईम ब्रांचने उत्तर देत तिहार जेलमध्ये सर्व व्यवस्था असून सुरक्षेच्या दृष्टीने कोणताच धोका नसल्याची माहिती संजीव चावलाच्या वकिलाला दिली आहे. 2000 मध्ये झालेल्या अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये फिक्सिंग केल्याचा आरोप संजीव चावलावर आहे. क्राईं ब्रांचने आपल्या रिपोर्टमध्ये संजीव चावलाच्या लंडनमधील घराचा आणि रेस्टॉरंटचा पत्तादेखील लिहिला आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएवर दिल्ली पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनंतर आरोपपत्र दाखल केले होते. मात्र त्याचा सहकारी हर्शेल गिब्ज व निकी बोए यांना सामनानिश्चिती प्रकरणातून वगळण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला होता. २०००मध्ये घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.
दक्षिण आफ्रिका व भारत यांच्यात २०००मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेच्या खेळाडूंनी हेतूपूर्वक खराब कामगिरी केली होती. या संदर्भात आफ्रिकेने किंग्ज आयोग नेमला होता. या आयोगासमोर गिब्जने सामना निश्चिती केल्याचा आरोप मान्य केला होता. कर्णधार क्रोनिएच्या सांगण्यावरून आपण हेतूपूर्वक खराब खेळ केला, असे त्याने सांगितले होते. क्रोनिएचे २००२मध्ये विमान अपघातात निधन झाले होते. निकी बोये याने मात्र आरोपाचे खंडन केले आहे.
दिल्ली पोलिसांनी क्रोनिए, संजीव चावला, राजेश कालरा, मनमोहन खट्टर, सुनील दारा उर्फ बिट्टू, टी सेरीजचे निर्माते गुलशन कुमार यांचा भाऊ किशनकुमार यांच्याविरुद्ध सामना निश्तितीचा आरोप केला होता.