संजूचा शतकी तडाखा; पुणे पराभूत
By admin | Published: April 12, 2017 03:34 AM2017-04-12T03:34:56+5:302017-04-12T03:34:56+5:30
संजू सॅमसनने ६३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ठोकलेल्या १०२ धावा आणि नंतर झहीर खान व अमित मिश्रा यांचे तीन आणि पॅट कमिन्सने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर
पुणे : संजू सॅमसनने ६३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांच्या साह्याने ठोकलेल्या १०२ धावा आणि नंतर झहीर खान व अमित मिश्रा यांचे तीन आणि पॅट कमिन्सने घेतलेल्या २ विकेटच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने आयपीएल स्पर्धेत पुणे सुपर जायंट संघाचा ९७ धावांनी पराभव केला. पुणे संघाचा सलग दुसरा पराभव होता.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून पुणे संघाने दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. दिल्ली संघाने विजयासाठी दिलेल्या २०६ धावांच्या आव्हानाला उत्तर देताना पुणे संघाची दिल्ली संघाच्या गोलंदाजांनी दाणादाण उडविली. पुणे सघांचा एकही फलंदाज २० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्यांचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. मयांक अगरवाल, रजत भाटिया व दीपक चहर हे जर सोडले तर पुणे संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिर होऊ शकला नाही. त्यांचा डाव १६.१ षटकात १०८ धावांत संपुष्टात आला.
तत्पूर्वी, दिल्ली संघाने २० षटकांत ४ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यांच्या सॅम बिलिंगने २४, संजू सॅमसनने आपल्या टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक (१०२) ठोकले, ॠषभ पंतने ३१ आणि ख्रिस मॉरिसने नाबाद ३८ धावा केल्या.
(क्रीडा प्रतिनिधी)
संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : आदित्य तरे झे. धोनी गो. चहर ०, सॅम बिलिंग्ज त्रि. गो. इम्रान ताहिर २४, संजू सॅमसन त्रि. गो. झम्पा १०२, ऋषभ पंत धावबाद ३१, कोरी अँडरसन नाबाद २, ख्रिस मॉरिस नाबाद ३८; अवांतर : ८; एकूण : २० षटकांत ४ बाद २०५; गोलंदाजी : दीपक चहर १/३५, इम्रान ताहिर १/८.
रायझिंग पुणे सुपरजायंट : अजिंक्य राहाणे १०, मयांक अगरवाल २०, राहुल त्रिपाठी १०, महेंद्रसिंह धोनी ११, रजत भाटिया १६, दीपक चहर १४; अवांतर : ५; एकूण : १६.१ षटकांत सर्वबाद १०८; गोलंदाजी : पॅट कमिन्स २/२४, झहीर खान ३/२०, अमित मिश्रा ३/११, शाहबाझ नदिम १/२३, ख्रिस मॉरिस १/१९.