सरदारसिंगची उचलबांगडी

By admin | Published: July 13, 2016 03:16 AM2016-07-13T03:16:03+5:302016-07-13T03:16:03+5:30

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवून देत भारताला थेट रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवून देणारा स्टार मिडफिल्डर सरदारसिंगकडे दुर्लक्ष करीत रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार गोलकिपर

Sardar Singh's picking bunglow | सरदारसिंगची उचलबांगडी

सरदारसिंगची उचलबांगडी

Next

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा मान मिळवून देत भारताला थेट रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवून देणारा स्टार मिडफिल्डर सरदारसिंगकडे दुर्लक्ष करीत रिओ आॅलिम्पिकसाठी स्टार गोलकिपर पी. आर. श्रीजेशकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. महिला संघाच्या कर्णधारपदी सुशीला चानूची निवड करण्यात आली.
हॉकी इंडियाचे (एचआय) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी पत्रकार परिषदेत भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल, बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे (आयओए) सचिव राजीव मेहता यांच्या उपस्थितीत रिओ आॅलिम्पिकसाठी भारताच्या पुरुष व महिला संघांची घोषणा केली.
भाजपा अध्यक्ष शहा यांनी उभय संघांच्या कर्णधारांच्या नावांची, तर विजय गोयल यांनी उभय संघांच्या उपकर्णधारांच्या नावांची घोषणा केली. स्टार गोलकिपर श्रीजेशची पुरुष संघाच्या कर्णधारपदी, तर फॉरवर्ड एस. व्ही. सुनीलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. डिफेंडर सुशीला चानूकडे महिला संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले, तर डिफेंडर दीपिकाची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. सरदारचे कर्णधारपद काढून घेण्यात आले असले, तरी संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. संघाची घोषणा करण्यात आली त्या वेळी उभय संघाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष लियांद्रो नेग्रे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
भारताला ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवून देणाऱ्या महिला संघाची कर्णधार रितू राणी हिला यापूर्वीच वगळण्यात आले आहे, तर सरदारला संघात कायम ठेवण्यात आले, पण कर्णधारपदावरून त्याची उचलबांगडी करण्यात आली. सध्या विश्व हॉकीमध्ये सर्वोत्तम गोलकीपरपैकी एक असलेल्या श्रीजेशने लंडनमध्ये सहा देशांच्या हॉकी स्पर्धेत नेतृत्व करताना संघाला रौप्यपदक पटकावून दिले. त्याचा त्याला लाभ मिळाला. श्रीजेशसाठी खेळाडू व कर्णधार म्हणून ही स्पर्धा सर्वोत्तम ठरली. सरदारसिंग मात्र मैदान व मैदानाबाहेरही अडचणीत असल्याचे दिसत आहे. मैदानात कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरत असलेल्या सरदारची मैदानाबाहेरही प्रतिमा मलिन होत आहे. ब्रिटनच्या एक महिलेने त्याच्यावर लग्नाचे आश्वासन देत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. सरदार सिंगने प्रदीर्घ कालावधीपासून संघाचे कर्णधारपद सांभाळले आहे. लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता.
सरदारसिंगला यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतरच्या स्पर्धेत सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली संघाला वेलेंसियामध्ये केवळ एक विजय मिळवता आला तोसुद्धा कमकुवत आयर्लंडविरुद्ध. भारताला या कालावधीत दोन लढतीत पराभव स्वीकारावा लागला, तर दोन सामने अनिर्णित संपले. (वृत्तसंस्था)

कर्णधारपद नाही, आॅलिम्पिक पदक महत्त्वाचे : सरदार
नवी दिल्ली : भारताला २०१४च्या इंचियोन आशियाई स्पर्धेत आपल्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक पटकावून देऊन थेट आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवून देणारा हॉकीपटू स्टार मिडफिल्डर सरदारसिंग याची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली असली, तरी त्यामुळे तो निराश झालेला नाही. कर्णधारपदापेक्षा देशाला आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावून देणे अधिक महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया सरदारने व्यक्त केली. सरदारसिंग म्हणाला, ‘‘माझ्यासाठी हॉकी आणि देश महत्त्वाचा आहे. आमचे एकमेव लक्ष्य आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आहे. दोन वर्षांपासून त्यासाठी कसून मेहनत घेत आहोत. माझ्यासाठी संघातील प्रत्येक सदस्य कर्णधार आहे. आमचे लक्ष्य पदक पटकावण्याचे आहे. सध्या सांघिक कामगिरीच्या जोरावर लक्ष्य गाठणे महत्त्वाचे आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणे गौरवाची बाब आहे. हॉकी हा सांघिक खेळ असून, त्यात कर्णधाराची कुठली भूमिका नसते. मी श्रीजेशला कर्णधारपदासाठी शुभेच्छा देतो. सध्या सांघिक कामगिरीच्या जोरावर आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे.’’

उभय संघ
पुरुष संघ
गोलकीपर : पी. आर. श्रीजेश (कर्णधार),
डिफेंडर : हरमनप्रीतसिंग, रूपिंदर पाल सिंग, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, व्ही. आर. रघुनाथ.
मिडफिल्डर : मनप्रीतसिंग, सरदारसिंग, एस. के. उथप्पा, दानिश मुज्तबा, देविंदर वाल्मीकी, चिंगलेनसाना सिंग.
फॉरवर्ड : एस.व्ही. सुनील (उपकर्णधार), आकाशदीपसिंग, रमनदीपसिंग, निकिन तिमैया.
पर्यायी खेळाडू : प्रदीप मोर (मिडफिल्डर) आणि विकास दहिया (गोलकिपर).

महिला संघ
गोलकीपर : सविता.
डिफेंडर : सुशीला चानू (कर्णधार), दीपग्रेस एक्का, दीपिका (उपकर्णधार), नमिता टोपो, सुनीता लाकडा.
मिडफिल्डर : नवज्योत कौर, मोनिका, निक्की प्रधान, रेणुका यादव, लिलिमा मिंज.
फॉरवर्ड : अनुराधा देवी थोकचोम, पूनम राणी, वंदना कटारिया, राणी, प्रीती दुबे.
पर्यायी खेळाडू : नियालुम लाल रुआत फेली (डिफेंडर) आणि रजनी एटीमारपू.

Web Title: Sardar Singh's picking bunglow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.