भारताविरुध्दचे विजयी रेकॉर्ड कायम ठेवणार : सरफराज
By admin | Published: May 27, 2017 12:36 AM2017-05-27T00:36:52+5:302017-05-27T00:36:52+5:30
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुध्द पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले असून चार जून रोजी होणाऱ्या भारताविरुध्दच्या सामन्यात
बर्मिंघम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुध्द पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले असून चार जून रोजी होणाऱ्या भारताविरुध्दच्या सामन्यात या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे मत पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने व्यकत केले आहे.
आयसीसी विश्वचषक आणि ट्वेंटी-२0 विश्वचषकात पाकिस्तानचे भारताविरुध्दचे रेकॉर्ड चांगले नाही, परंतु आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मात्र पाकिस्तानचे रेकॉर्ड चांगले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने झाले असून त्यापैकी दोन पाकिस्तानने तर एक सामना भारताने जिंकला आहे. सरफराज म्हणाला, हेच रेकॉर्ड आम्ही पुढे सुरु ठेवू. दोन्ही देशातील चाहत्यांसाठी हा सामना मोठी पर्वणी असली तरी आम्ही एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
सरफराज पुढे म्हणाला, आमच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. आम्ही येथे फक्त नैसर्गिक खेळ करण्यावर भर देणार आहोत. आम्ही नुकतीच वेस्ट इंडीजविरुध्द चांगली मालिका खेळली. यात आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर आम्ही इंग्लंडमध्ये येवून एजबस्टनला केलेला सराव उपयोगी ठरेल. वेस्ट इंडिजमध्ये केलेल्या चुका आम्ही सरावात सुधारण्याचा प्रयत्न केला. विशेषत: क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्यात यश आले आहे.
पाकिस्तानला या स्पर्धेत आठवे मानांकन मिळाले असून बांगलादेश त्यांच्यापेक्षा दोन स्थानांनी पुढे सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानला बांगला देशविरुध्द सराव सामना खेळायचा आहे. त्याबद्दल सरफराज म्हणाला, २00६ नंतर पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणाऱ्या बांगलादेश संघाने गेल्या १८ महिन्यात चांगला खेळ केला आहे. त्यांच्या कामगिरीने मी खूपच प्रभावीत झालो आहे. (वृत्तसंस्था)