सरवन घेणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
By admin | Published: September 15, 2016 11:22 PM2016-09-15T23:22:01+5:302016-09-15T23:22:01+5:30
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रामनरेश सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सरवान गयानामध्ये त्याची अधिकृत घोषणा करणार आहे.
सेन्ट जोन्स : वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार रामनरेश सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. सरवान गयानामध्ये त्याची अधिकृत घोषणा करणार आहे.
सरवन प्रदीर्घ कालावधीपासून संघातून बाहेर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्ध ओव्हलवर खेळला होता. ३६ वर्षीय सरवनने कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना २००० मध्ये बार्बाडोस येथे पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. या व्यतिरिक्त त्याने वन-डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात २००० मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. सरवनने १८१ वन-डे सामन्यांत ४२.६७ च्या सरासरीने ५८०४ धावा फटकावल्या आहेत. त्याची वन-डेतील सर्वोत्तम खेळी नाबाद १२० आहे. ही खेळी त्याने २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध केली होती. सरवनने राष्ट्रीय संघातर्फे ८७ कसोटी सामने खेळले. त्याने ४०.०१ च्या सरासरीने ५८४२ धावा केल्या. कसोटीमध्ये नाबाद २९१ त्याची सर्वोत्तम खेळी केली. ही खेळी त्याने २००९ मध्ये इंग्लंडविरुद्ध बार्बाडोस येथे केली होती. सरवानने अखेरचा कसोटी सामना भारताविरुद्ध २०११ मध्ये बार्बाडोस येथे खेळला होता.
सरवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी फलंदाज ठरला आहे. सरवानने ब्रायन लारानंतर संघाचे नेतृत्व केले, पण त्याला अधिक काळ या पदाचा आनंद घेता आला नाही. त्याने चार कसोटी, पाच वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. (वृत्तसंस्था)