ऐतिहासिक! सातारच्या लेकीनं मैदान मारलं; १७ वर्षीय अदिती तिरंदाजीमध्ये ठरली 'विश्वविजेती'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 05:55 PM2023-08-05T17:55:41+5:302023-08-05T17:55:54+5:30
World Archery Championships : भारताच्या सुवर्णकन्यांनी तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे.
भारताच्या सुवर्णकन्यांनी तिरंदाजीच्या क्षेत्रात इतिहास रचला आहे. सातारची असलेल्या अदिती स्वामी हिने जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. लक्षणीय बाब म्हणजे १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे. तिने महिलांच्या या स्पर्धेत सुवर्ण पटकावून तिरंग्याची शान वाढवली. खरं तर काल ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला होता. आज देखील अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने शनिवारी जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले.
#KheloIndia Athlete Aditi Gopichand Swami crowned World Champion at the #ArcheryWorldChampionships🇩🇪🏹
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2023
The 17 year old created history by defeating 🇲🇽's Andrea Beccera 149-147 in the Women's Individual Compound final and winning the glorious🥇for 🇮🇳
Heartiest congratulations! pic.twitter.com/polCvgfFUW
दरम्यान, अदिती ही भारतातील तिरंदाजीमधील पहिली वैयक्तिक जागतिक चॅम्पियन आहे. या कम्पाऊंडमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे. या घवघवीत यशानंतर बोलताना अदितीने म्हटले, "माझ्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नांना आज फळ मिळाले आहे. मी व्यासपीठावर ५२ सेकंदांचे राष्ट्रगीत वाजण्याची वाट पाहत होते... ही फक्त सुरुवात आहे, मला भारतासाठी पुढील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे". ऐतिहासिक विजयानंतर अदिती भारावून गेल्याचे पाहायला मिळाले.
शुक्रवारी भारताच्या महिला शिलेदारांनी सांघिक अंतिम फेरीत देशासाठी पहिले सुवर्ण जिंकले होते. अंतिम फेरीचा सामना करण्यापूर्वी अदितीने उपांत्य फेरीत अधिक अनुभवी असलेल्या ज्योती सुरेखा वेन्नमचा पराभव केला. अदितीच्या अप्रतिम खेळीमुळे ज्योतीला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले. तिने तुर्कस्तानच्या इपेक टॉमरुकला हरवून कांस्यपदक जिंकले. या कांस्य पदकासह ज्योतीच्या नावावर आठव्या जागतिक पदकाची नोंद झाली आहे.