सतेंदर, मोहित यांचे रौप्यपदकावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:05 AM2017-08-08T02:05:45+5:302017-08-08T02:05:48+5:30
फिलिपाइन्स येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांची कमाई केली.
नवी दिल्ली : फिलिपाइन्स येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांची कमाई केली. सतेंदर रावत (८० हून अधिक किलो) आणि मोहित खटाना (८० किलो) यांना आपआपल्या गटाच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सतेंदरला उझबेकिस्तानच्या अल्मातोव शोकरुख याच्याविरुद्ध गुणांच्या आधारे पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी, अन्य
अंतिम सामन्यात मोहितला कझाखस्तानच्या तोगमबे सेगिनदिक याने धूळ चारली. या दोन पराभवांमुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
याआधी अंकित नरवाल (५७ किलो), भावेश कट्टीमनी (५२ किलो), सिद्धार्थ मलिक (४८ किलो), विनीत दहिया (७५ किलो), अक्षय सिवाच (६० किलो) आणि अमन सेहरावत (७२ किलो) या खेळाडूंनी आपआपल्या वजनी गटात चमकदार कामगिरी करताना भारताला कांस्य मिळवून दिले होते. यासह स्पर्धेत भारताने दोन रौप्य आणि सहा कांस्यपदकांची कमाई करत आपली छाप पाडली. (वृत्तसंस्था)