सात्त्विक-चिराग जोडीला चीन मास्टर्समध्ये उपविजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:17 AM2023-11-27T10:17:25+5:302023-11-27T10:18:00+5:30
शेनझेन : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला रविवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष ...
शेनझेन : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला रविवारी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत त्यांना चीनच्या लियांग वेई केंग आणि वांग चांग जोडीविरुद्ध पराभव पत्करावा लागला.
भारताच्या जोडीने पहिला गेम १९-२१ असा गमावला. त्यानंतर शानदार रॅली करताना त्यांनी दुसरा गेम २१-१८ असा जिंकत लढतीत पुनरागमन केले.
निर्णायक गेममध्ये १-८ अशा पिछाडीवरून त्यांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण तिसरा गेम १९-२१ असा गमावल्याने भारताच्या जोडीला एक तास ११ मिनिटे रंगलेल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ही जोडी दुसऱ्या बीडब्ल्यूएफ सुपर ७५० विजेतेपदापासून अवघ्या एका विजयाच्या अंतरावर होती. पण लियांग वेई केंग आणि वांग या जगातील अव्वल जोडीने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. हांगझोऊ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय जोडीने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करत सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. चीनच्या जोडीने संयम राखताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह लियांग आणि वांग जोडीने आशियाई स्पर्धेत भारतीय जोडीकडून मिळालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. सात्त्विक-चिरागसाठी हे वर्ष शानदार ठरले. त्यांनी यावर्षी आशियाई बॅडमिंटन स्पर्धा, इंडोनेशिया सुपर १०००, कोरिया सुपर ५००, स्वीस सुपर ३०० आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
बचाव ठरला कमकुवत
चढउतार असलेल्या अंतिम लढतीत भारतीय जोडी सर्वोत्तम कामगिरी करू शकली नाही. दबावात त्यांचा बचाव कमकुवत ठरला. सात्त्विक बचाव करण्यात अपयशी ठरला तर वांगने संधींचा लाभ घेत गुण मिळविले. अंतिम लढतीत दोन्ही जोड्यांचा कस लागला. लियांग आणि वांग यांना अंतिम फेरीच्या आधी भारतीय जोडीविरुद्ध विजयी कामगिरी बरोबरीची होती. त्यात सात्विक आणि चिरागने अधिकाधिक सामने सरळ गेममध्ये जिंकले आहेत.