सात्विक आणि चिरागनं रचला इतिहास! 'जगज्जेत्या'ला नमवून इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 03:38 PM2023-06-18T15:38:00+5:302023-06-18T15:39:12+5:30
Indonesia Open : भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी इतिहास रचला आहे.
जकार्ता : भारताचे स्टार बॅटमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांनी इतिहास रचला आहे. जगज्जेत्याला नमवून इंडोनेशिया ओपनमध्ये विजय मिळवत भारतीय शिलेदारांनी तिरंग्याची शान वाढवली. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने ॲरॉन चिया आणि सोह वुई यिक या मलेशियाच्या जोडीचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
विशेष बाब म्हणजे सात्विक आणि चिराग या जोडीचे हे पहिले सुपर १००० वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. मलेशियाच्या जोडीविरुद्ध सातवेळा पराभूत झाल्यानंतर सात्विक आणि चिराग यांना प्रथमच विजय मिळवण्यात यश आले. इंडोनेशिया ओपनच्या दुहेरीत भारताचे हे पहिले विजेतेपद आहे. खरं तर अॅरोन चिया आणि सोह वुई यिक ही जोडी पुरुष दुहेरीत जगज्जेते आहे.
भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिला गेम आपल्या नावावर केला. मलेशियाच्या जोडीने सामन्याची दमदार सुरुवात केली. कारण त्याच्याकडे ०-३ अशी मोठी आघाडी होती, त्यानंतर स्कोअर ३-७ असा झाला. पण त्यानंतर भारतीय जोडीने पुनरागमन करत ११-९ अशी आघाडी घेतली. यादरम्यान, सात्विक आणि चिरागने सलग ६ गुण मिळवले. यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार खेळ झाला. अखेर भारतीय जोडीने पहिला गेम १८ मिनिटांत २१-१७ अशा फरकाने जिंकला.
सात्विकसाईराज आणि चिराग जोडीचा भीमपराक्रम
राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन सात्विक आणि चिराग या जोडीला दुसऱ्या गेममध्ये देखील आव्हानांचा सामना करावा लागला. ॲरॉन चिया आणि सोह वुई यिक यांचे मोठे आव्हान भारतीय शिलेदारांची डोकेदुखी वाढवत होते. एका टप्प्यावर सामना ५-५ असा बरोबरीत होता. मात्र, भारतीय जोडीने आघाडी घेण्यास सुरूवात केली आणि विजयाच्या दिशेने कूच केली. दुसऱ्या हाफच्या ब्रेकपर्यंत भारतीय जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. यानंतर सात्विक आणि चिरागने आपला अप्रतिम खेळ सुरूच ठेवला. त्यांची आघाडी २०-१४ अशी झाली होती पण त्यांच्याकडून काही चुका देखील झाल्या. मलेशियाच्या जोडीने सलग चार गुण घेऊन रंगत आणण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारतीय जोडीने २१-१८ अशा स्कोअरने गेमसह किताब देखील आपल्या नावावर केला.