CWG 2022: ११ दिवस, ८ सामने, २ पदके! भावाच्या हातचे जेवण खाऊन 'हा' खेळाडू बनला चॅम्पियन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 01:22 PM2022-08-10T13:22:54+5:302022-08-10T13:25:51+5:30
भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत.
नवी दिल्ली : भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) खूप खास ठरली असून यंदाच्या ११ दिवसाच्या स्पर्धेत भारताने विक्रमी पदके जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांसह एकूण ६१ पदकांवर देशाचे नाव कोरले. तब्बल ७२ देशातील खेळाडू एका मोठ्या व्यासपीठावर जमल्याने स्पर्धेने अवघ्या जगाला आकर्षित केले होते. लक्षणीय बाब म्हणजे पहिल्यांदाच भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण जिंकले आहेत. महिला एकेरीत पी.व्ही सिंधू (PV Sindhu), पुरूष एकेरीत लक्ष्य सेन आणि पुरूष दुहेरीमध्ये सात्विक साईराज (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टीच्या (Chirag Shetty) जोडीने ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले. यापूर्वी भारताला कधीच पुरूष दुहेरीच्या गटात सुवर्ण मिळाले नव्हते.
बॅडमिंटन खेळाडूंचे व्यस्त वेळापत्रक
राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटन खेळाडूंचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. त्यांना जवळपास सलग ४ दिवस सामने खेळायचे होते. सर्वप्रथम हे खेळाडू मिश्र सांघिक स्पर्धेत उतरले आणि २ तारखेला अंतिम फेरीनंतर ते आपापल्या स्पर्धांना सामोरे गेले. सात्विक आणि चिराग या जोडीला मिश्र स्पर्धेचे सर्व सामने खेळावे लागले. सात्विक फक्त एका सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर तो त्याच्या श्रेणीमध्ये सुवर्ण पदक जिंकण्यात यशस्वी झाला, ज्यासाठी तो दररोज सामने खेळत होता. अशा परिस्थितीत खेळाडूंसमोर त्यांचा फिटनेस राखण्याचे मोठे आव्हान होते. तसेच थकवा टाळण्याची जबाबदारी असताना याची सर्व जबाबदारी सात्विक साईराज याच्या भावाने चोखपणे पार पाडली.
भावाने केली सात्विकच्या जेवणाची सोय
सात्विकचा भाऊ रामचरन रंकीरेड्डी त्याच्या सोबत बर्गिंहॅमला गेला होता. तो त्याच्या भावासाठी स्वत:च्या हाताने जेवण बनवत होता. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सामना झाल्यानंतर सात्विकला त्याच्या आवडीचे जेवण द्यायची जबाबदारी रामचरनने घेतली होती. सतत सामने खेळून थकवा येणे सामान्य आहे हे त्याला माहिती होते. म्हणूनच तो सात्विकच्या जेवणाची विशेष काळजी घ्यायचा. सात्विकने सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रत्येक दोन सामन्यानंतर तो प्रत्येकवेळी जखमी व्हायचा मात्र यावेळी त्याला बरे वाटत आहे. मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यातही सात्विक आणि चिराग या जोडीचा मोलाचा वाटा होता.
जेवणाच्या बाबतीत भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू सर्वांपेक्षा पुढे आहे. तिला हवी ती गोष्ट खाण्याकडे सिंधूचा जास्त कल असतो. बर्मिंगहॅममध्ये तिला तिच्या आवडीची बिर्याणी भेटली नाही पण तिने इटालियन खाद्यपदार्थांचा स्वाद घेऊन आनंद लुटला. या स्पर्धेत सिंधूला दोन पदके जिंकण्यात यश आले. तिने मिश्र सांघिक स्पर्धेत सांघिक रौप्यपदक जिंकले, तर एकेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकून तिने पहिल्यांदाच रौप्य पदकाची सीमा ओलांडली. राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूने प्रथमच सुवर्णपदक पटकावले आहे.