साऊदीने केला इंग्लंडचा ‘सफाया’

By admin | Published: February 21, 2015 02:24 AM2015-02-21T02:24:20+5:302015-02-21T02:24:52+5:30

ब्रेंडन मॅक्युलम याने अवघ्या १८ चेंडूंत विक्रमी अर्धशतक झळकवित न्यूझीलंडला विश्वचषकाच्या अ गटात शुक्रवारी झटपट आठ गड्यांनी विजय मिळवून दिला.

Saudis' England 'eliminated' | साऊदीने केला इंग्लंडचा ‘सफाया’

साऊदीने केला इंग्लंडचा ‘सफाया’

Next

न्यूझीलंडचा ८ गड्यांनी विजय : टीम साऊदीचे सात बळी, मॅक्युलमचे जलद अर्धशतक

वेलिंग्टन : वेगवान गोलंदाज टीम साऊदीने सात बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम याने अवघ्या १८ चेंडूंत विक्रमी अर्धशतक झळकवित न्यूझीलंडला विश्वचषकाच्या अ गटात शुक्रवारी झटपट आठ गड्यांनी विजय मिळवून दिला.
साऊदीच्या सात बळींमुळे न्यूझीलंडने इंग्लंडला ३३.२ षटकांत अवघ्या १२३ धावांत रोखले. प्रत्युत्तरात १२.२ षटकांत केवळ दोन गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. मॅक्युलमने २५ चेंडूंत ७७ धावा केल्या. त्यात १८ चेंडूंवर अर्धशतक ठोकून विश्वचषकात नवा विक्रम नोंदविला. त्याने आठ चौकार आणि सात षटकार मारले. २००७ मध्ये विंडीजमध्ये झालेल्या विश्वचषकात मॅक्युलमने कॅनडाविरुद्ध २० चेंडूंवर अर्धशतक नोंदविले होते. तो विक्रम मागे टाकला. याआधी द. आफ्रिकेचा डिव्हिलियर्स याने १६ व सनथ जयसूर्याने १७ चेंडूंवर अर्धशतक पूर्ण केले होते.मॅक्युलम पहिल्या चेंडूपासून तुटून पडला. स्टीव्हन फिनच्या दोन षटकांत त्याने ४९ धावा वसूल केल्या. संपूर्ण खेळीत त्याच्या केवळ तीन एकेरी धावा होत्या. उर्वरित धावा चौकार-षटकारांनी पूर्ण झाल्या. त्याआधी साऊदी विश्वचषकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज बनला. त्याने नऊ षटकांत ३३ धावा देत सात गडी बाद केले.
इंग्लंडचा कर्णधार इयान मोर्गन याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाच षटकांच्या पहिल्या स्पेलमध्ये दोन गडी बाद करणाऱ्या साऊदीच्या माऱ्यापुढे इंग्लिश फलंदाजांनी गुडघे टेकले. ट्रेंट बोल्ट, व्हेट्टोरी आणि मिल्ने यांनी एकेक गडी बाद केला. इंग्लंडकडून ज्यो रुट अपवाद ठरला. त्याने सर्वाधिक ४६ व सलामीचा मोईन अली याने २० धावा केल्या. इंग्लंडच्या एकवेळ ३ बाद १०३ धावा होत्या. त्यानंतर पत्त्यासारखा डाव कोसळून १९ धावांत अखेरचे सात गडी बाद झाले. (वृत्तसंस्था)

अनपेक्षित विजयावर
मॅक्युलम आश्चर्यचकित
४विश्वचषकात इंग्लंडवर मिळविलेल्या एकतर्फी विजयावर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम स्वत: आश्चर्यचकित आहे. हा अनपेक्षित विजय असल्याचे त्याचे मत आहे. ‘‘हा देखणा विजय आहे. इंग्लंड संघ अक्षरश: झुंजत राहिला. चेंडू इतके स्विंग झाले, की प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यातून सावरता आले नाही.’’ असे मॅक्युलम म्हणाला.

साऊदीची सर्वोत्कृष्ट कामगिरी
४१८ धावा देत सात बळी घेणारा टीम साऊदी विश्वचषकात अशी कामगिरी करणारा देशाचा पहिला गोलंदाज ठरला. सध्या कोच असलेल्या शेन बॉण्ड याला त्याने मागे टाकले.
४२००५ मध्ये बुलावायो येथे बॉण्डने भारताचे १९ धावांत सहा बळी घेतले होते. विश्वचषकात याआधी आॅस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा याने १५ धावांत सात आणि आॅस्ट्रेलियाच्याच अ‍ॅण्डी बिकल याने २० धावांत सात गडी बाद केले आहेत.

18 : न्यूझीलडंचा विस्फोटक फलंदाज ब्रँडन मॅक्युलमने विश्वचषक स्पर्धेत १८ चेंडूंत अर्धशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. यापूर्वी एकदिवसीय क्रिकटमध्ये एबी डिव्हिलियर्स याने १६ चेंडूंत अर्धशतक केले आहे.

१२३: इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर विश्वचषक स्पर्धेतील सर्वात कमी धावसंख्या.

0७ : टीम साऊदी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचे ७ गडी तंबूत पाठवून न्यूझीलंडकडून विक्रमी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. पूर्वी न्यूझीलंडकडून तीन वेळा ६ विकेट घेतल्या गेल्या आहेत. त्यात दोन वेळा त्यांच्या शेन बॉन्डने ३ विकेट घेण्याची कामगिरी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सात विकेट घेण्याची ही नववी वेळ आहे.

३0८: ब्रॅन्डन मॅक्युलमने २५ चेंडूंत ७७ धावा केल्या तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट ३०८ होता. एकदिवसीयमध्ये
५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये हा दुसरा सर्वोच्च
स्ट्राईक रेट आहे.

२२६: न्यूझीलंड संघाने जेव्हा १२४ धावांचे टार्गेट पूर्ण केले तेव्हा २२६ चेंडू बाकी होते. न्यूझीलंड संघाने आपला विजय १२.२ षटकांत साजरा केला.

६.४ : न्यूझीलंड संघाने आपल्या संघाचे शतक ६.४ षटकांत फलकावर लावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २००१ नंतर ही सर्वात जलद खेळी आहे. जलद ५० धावा करण्याचा विक्रमसुद्धा न्यूझीलंडच्या नावावर आहे. २००७ मध्ये त्यांनी बांगलादेशविरुद्ध ३.३ षटकांत ५० धावा कुटल्या होत्या.

४इंग्लंड : इयान बेल त्रि. गो. साऊदी ८, मोईन अली त्रि. गो. साऊदी २०, गॅरी बॅलन्स झे. विल्यम्सन गो. बोल्ट १०, ज्यो रुट झे. व्हेट्टोरी गो. मिल्ने ४६, इयान मॉर्गन झे. मिल्ने गो. व्हेट्टोरी १७, जेम्स टेलर त्रि. गो. साऊदी ००, जोस बटलर झे. रोंची गो. साऊदी ३, ख्रिस वोक्स त्रि. गो. साऊदी १, स्टुअर्ट ब्रॉड झे. व्हेट्टोरी गो. साऊदी ४, स्टीव्हन फिन झे. टेलर गो. साऊदी ००, जेम्स अ‍ॅण्डरसन नाबाद १, अवांतर : १३, एकूण : ३३.२ षटकांत १२३ धावा. गडी बाद क्रम : १/१८, २/३६, ३/५७, ४/१०४, ५/१०४, ६/१०८, ७/११०, ८/११६, ९/११७, १०/१२३. गोलंदाजी : साऊदी ९-०-३३-७, बोल्ट १०-२-३२-१, मिल्ने ५.२-१-२५-१, व्हेट्टोरी ७-०-१९-१,अ‍ॅण्डरसन २-०-८-०.
४न्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल त्रि. गो. वोक्स २२, ब्रँडन मॅक्युलम त्रि. गो. वोक्स ७७, केन विल्यम्सन नाबाद ९, रॉस टेलर नाबाद ५, अवांतर : १२, एकूण : १२.२ षटकांत २ बाद १२५ धावा. गडी बाद क्रम : १/१०५, २/११२. गोलंदाजी : अ‍ॅण्डरसन ५-०-३७-०, ब्रॉड २.२-०-२७-०, फिन २-०-४९-०, वोक्स ३-१-८-२.
 

 

Web Title: Saudis' England 'eliminated'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.