सौरभ चौधरीचा आशियाई एअरगन स्पर्धेत सुवर्णवेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:08 AM2018-11-09T02:08:06+5:302018-11-09T02:08:33+5:30
भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले.
कुवैतसिटी - भारताचा युवा नेमबाज सौरभ चौधरी याने शानदार कामगिरी कायम राखून गुरुवारी येथे आशियाई एअरगन चॅम्पियनशिपच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत चार माहिन्यात हे त्याचे चौथे सुवर्ण आहे.
मेरठचा १६ वर्षांचा सौरभ याने अर्जुनसिंग चिमा तसेच अनमोल जैन यांच्यासोबतीने १७३१ गुणांसह सांघिक स्पर्धेत सुवर्णाचा मानकरी ठरला.आठ खेळाडूंच्या वैयक्तिक फायनलमध्ये सौरभने २३९.८ गुणांसह दुसरे सुवर्ण पटकविले. अर्जुनने २३७.७ गुणांसह रौप्य आणि चायनीज तायपेईचा हुआंग वेई-ते याने २१८ गुणांसह कांस्य जिंकले. अनमोल १९५.१ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला.
सौरभने याआधी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. नंतर त्याने विश्व चॅम्पियनशिप आणि युवा आॅलिम्पिकमध्येही सुवर्णमय कामगिरी केली होती. या स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या दहा झाली असून त्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)