सौरव गांगुली बनला कॅबचा अध्यक्ष
By admin | Published: September 24, 2015 11:49 PM2015-09-24T23:49:49+5:302015-09-25T03:40:16+5:30
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला गुरुवारी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला गुरुवारी बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. गांगुलीला अध्यक्ष नियुक्त केल्याची घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात कॅबच्या सिनियर पदाधिकारी आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
एक अन्य महत्त्वपूर्ण घटनाक्रमात दालमिया यांचे चिरंजीव अभिषेक यांना दोन संयुक्त सचिवांपैकी एका पदावर नियुक्त करण्यात आले. अभिषेक दालमिया गांगुलीची जागा घेतील. सुबीर गांगुली दुसरे संयुक्त सचिव म्हणून पूर्वीप्रमाणेच जबाबदारी पार पाडतील. विश्वरूप डेदेखील कोषाध्यक्ष म्हणून कायम असतील.
हा निर्णय कॅब पदाधिकाऱ्यांनी घेतला असे मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या स्पष्ट केले. आपण फक्त राज्यांत क्रिकेटला पुढे आणण्यास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी उपस्थित होतो, असे त्यांनी म्हटले; परंतु दिवंगत दालमिया यांच्या स्थानी गांगुलीला नियुक्त करण्यात सरकारने हस्तक्षेप केला. मी हस्तक्षेप करणे योग्य नव्हते. त्यांनी चांगले काम करावे हीच माझी इच्छा होती. मी फक्त एक सहकारी म्हणून उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला. मी घोषणा करू इच्छित नव्हते; परंतु सर्वांनी मला आग्रह केला. अनेक वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौरव गांगुलीसारख्या खेळाडूने ही भूमिका बजवायला हवी असे मला वाटले आणि त्याने अभिषेक, सुबीर, विश्वरूप आणि अन्य सर्वच सिनियर सदस्यांच्या रूपाने एक टीम बनवायला हवी, असे बॅनर्जी म्हणाल्या.
दालमिया यांच्या निधनानंतर आम्ही मोठ्या संकटातून जात होतो. कोणाला तरी कॅबचे प्रमुख बनवायचे होते. दालमिया क्रिकेटचे खूप चाहते होते. त्यामुळे हे पद सांभाळणारी व्यक्ती त्यांच्या जवळची असणे आवश्यक होते. क्रिकेट कुटुंब खूप महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी म्हटले.