स्कोअरिंग ठरेल विजयाचे गुपित : ग्रँडमास्टर अभिजित कुंटे गोव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:52 AM2018-10-15T06:52:10+5:302018-10-15T06:52:24+5:30
- सचिन कोरडे एकाच वेळी १५५ मुलांविरुद्ध सतत साडेआठ तास खेळण्याचा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे सध्या गोव्यातील पहिली ...
- सचिन कोरडे
एकाच वेळी १५५ मुलांविरुद्ध सतत साडेआठ तास खेळण्याचा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्राचा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे सध्या गोव्यातील पहिली ग्रँडमास्टर्स ओपन बुद्धिबळ स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेचा दावेदार म्हणूनही त्याच्याकडे पाहिलेजात आहे. जगातील आघाडीच्या ग्रँडमास्टर्सना टक्कर देण्यासाठी त्याने काही व्यूहरचनाही आखल्या आहेत. स्पर्धेत खेळाडूंची संख्या अधिक असल्याने केवळ विजय किंवा ‘ड्रॉ’वर लक्ष ठेवून चालणार नाही तर स्कोअरिंगवरच लक्ष केंद्रित करावे लागेल, असे अभिजितने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर शनिवारी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी अत्यंत शांत आणि नम्र असलेल्या अभिजितने गोमंतकीय कला-संस्कृतीदर्शनाचा लाभ घेतला. त्याने गोव्याच्या आठवणीही सांगितल्या.
तो म्हणाला, ‘‘१९८७ मध्ये मडगाव येथे राष्ट्रीय ज्युनियर स्पर्धा आणि त्यानंतर २००२-०३ मध्ये विश्व ज्युनियर स्पर्धा खेळण्यासाठी मी गोव्यात आलो होतो. खूप वर्षांनंतर आता पहिल्यांदाच गोव्यात आलो आहे. तेव्हाच्या आणि आताच्या बुद्धिबळातील वातावरणात खूप बदल झालेला आहे. मोठ्या पातळीवर ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजिली जात आहे. ही स्पर्धा येथेच व्हावी, अशी अपेक्षा आहे; कारण या स्पर्धेमुळे गोव्यातील नव्हे, तर शेजारील राज्यांतील खेळाडूंना सहभागाची संधी मिळेल. तसेच बुद्धिबळासाठी गोव्यात चांगले वातावरण आहे.
काही वर्षांत दर्जेदार खेळाडू गोव्याला मिळाले आहेत. त्यात अनुराग म्हामलच्या रूपाने पहिला ग्रँडमास्टर मिळाला. ७-८ वर्षांपासून तो खेळत आहे.
अत्यंत ‘चपळ व तल्लख’ असा हा खेळाडू असूनत्याची मेहनत, सातत्य आणि कौशल्य यांमुळेच त्याला इथंपर्यंत पोहोचता आले. मी आॅगस्टमध्ये अबुधाबी येथे खेळलो. ही स्पर्धा चुरशीची झाली. समाधानकारक निकाल लागला. अनुभवही चांगला होता. तेथील अनुभव या स्पर्धेसाठी उपयोगी
पडेल, असा विश्वास आहे.
या स्पर्धेतही १५० खेळाडू २००० रेटिंगच्या खाली आहेत. त्यामुळे स्कोअरिंग महत्त्वाचे ठरेल. बऱ्याचदा आपण काही सामने जिंकतो आणि काही सामने अनिर्णीत राखतो; पण स्कोअरिंग कमी असेल तर त्याचा फायदा होत नाही. जेव्हा खेळाडूंचा सहभाग मोठा असतो तेव्हा तुम्हाला स्कोअरिंगशिवाय पर्याय नसतो.
बुद्धिबळासाठी निधी कमीच...
देशाला काही वर्षांत बरेच ग्रँडमास्टर मिळाले आहेत. या खेळाचे भविष्य कसे दिसते, याबाबत अभिजित म्हणाला, की या खेळासाठी अजूनही निधी कमीच आहे. पाहिजे तसा पैसा या खेळात नाही. बुद्धिबळही आता व्यावसायिक होत आहे. त्यामुळे थोडे पैसे मिळतात; परंतु या खेळातून नोकºया मिळण्याची संधी आणि संख्या कमी झाली आहे. बºयाच राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा तास सुरू केलेला आहे. त्यामुळे किती फायदा होईल, असे विचारले असता कुंटे म्हणाला, की निश्चितच ही कल्पना खूप चांगली आहे; परंतु शाळांच्या काही तांत्रिक अडचणी असतात. त्यांच्यावर आपण दबाव आणू शकत नाही. या खेळाची ओळख निर्माण होण्यासाठी आठवड्यातून एकदा एक तास व्हावा, ही कल्पना चांगली आहे.