दुसरा दिवस पावसाचा
By admin | Published: January 4, 2016 11:53 PM2016-01-04T23:53:41+5:302016-01-04T23:53:41+5:30
आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे फक्त ११.२ षटकांचा खेळ होऊ शकला; परंतु त्यातही कार्लोस ब्रेथवेटने वादळी फलंदाजी करताना
सिडनी : आॅस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामन्यात पावसामुळे फक्त ११.२ षटकांचा खेळ होऊ शकला; परंतु त्यातही कार्लोस ब्रेथवेटने वादळी फलंदाजी करताना उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
वेस्ट इंडीजने आज ६ बाद २0७ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि ७ बाद २४८ अशी धावसंख्या असतानाच पावसाचे आगमन झाले आणि त्यानंतर खेळ होऊ शकला नाही.
ब्रेथवेटने आज आक्रमक पावित्रा अवलंबताना उपाहारानंतर जेम्स पॅटिन्सनला दोन षटकार ठोकले. त्याने पॅटिन्सनच्या चेंडूवर पहिले कव्हर आणि नंतर बॅकवर्ड स्क्वेअरलेगला षटकार ठोकला. तथापि, पॅटिन्सनने त्याच्या पुढच्या षटकात या अष्टपैलू खेळाडूला त्रिफळाबाद केले. ब्रेथवेटने ७१ चेंडूंत ७ चौकार, ४ षटकारांसह ६९ धावा केल्या. तथापि, तो सिडनी क्रिकेट मैदानावर उपस्थित १४ हजार २६६ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला. ब्रेथवेटला शतक न झळकावण्याची खंत वाटतेय. तो म्हणाला, ‘‘मी शतकापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यामुळे निराश आहे; परंतु कसोटी क्रिकेटमधील माझी सर्वोच्च खेळी करण्यात यशस्वी ठरल्याने आनंदी आहे.’’ पावसामुळे जेव्हा दिवसाचा खेळ संपला तेव्हा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश रामदिन ३0 धावांवर खेळत होता, तर केमार रोचने खातेदेखील उघडले नव्हते. मंगळवारीदेखील पावसाचे भाकित करण्यात आले आहे.
आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यात मोठ्या अंतराने विजय मिळवताना याआधीच फ्रँक वॉरेल करंडक आपल्या नावावर केला होता.
संक्षिप्त धावफलक :
वेस्ट इंडीज पहिला डाव : ७ बाद २४८. (क्रेग ब्रेथवेट ८५, कार्लोस ब्रेथवेट ६९, ब्राव्हो ३३, दिनेश रामदिन खेळत आहे ३0, पॅटिन्सन २/६७, लियोन २/७८).