प्रो कबड्डीची दुसरी ‘एन्ट्री’ दिमाखात
By admin | Published: July 17, 2015 02:45 AM2015-07-17T02:45:34+5:302015-07-17T02:45:34+5:30
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला शनिवार पासून दिमाखात सुरुवात होईल. तत्पूर्वी गुरुवारी मुंबईतील लोअर परेल येथे एका शानदार
मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राला शनिवार पासून दिमाखात सुरुवात होईल. तत्पूर्वी गुरुवारी मुंबईतील लोअर परेल येथे एका शानदार कार्यक्रममध्ये स्पर्धेतील सहभागी आठ संघाच्या खेळाडूंच्या उपस्थितीत प्रो कबड्डीच्या चषकाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी आयोजकांनी यंदाच्या सत्रात स्पर्धेतील काही बदलांची माहिती देऊन यंदाची प्रो कबड्डी कबड्डीचाहत्यांना नक्की खिळवून ठेवेल असा विश्वासही व्यक्त केला. दखल घेण्याची बाब म्हणजे स्पर्धेच्या पहिल्या सामन्याआधी बॉलिवूडचे शेहनशहा बिग बी अमिताभ बच्चन स्वत: राष्ट्रगीत गाणार असल्याची माहिती देखील आयोजकांनी दिली.
प्रो कबड्डीला पहिल्या सत्रात मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सर्वांच्या नजरा १८ जुलै पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्राकडे लागले आहेत. यंदा स्पर्धेत प्रत्येक संघामध्ये खेळाडूंची संख्या वाढल्याने स्पर्धा पहिल्यापेक्षा जास्त चुरशीची होईल असे आयोजकांनी सांगितले. गतवर्षी प्रत्येक संघामध्ये १४ खेळाडू होते आणि यंदा हीच संख्या २५ वर गेली आहे.
त्याचबरोबर यंदा प्रत्येक सामन्यावेळी स्पेशल इफेक्ट्सच्या मदतीने ग्राफीक्स आणि अॅनिमेशनच्या जोरावर प्रो कबड्डी आणखी आकर्षक होणार असल्याचे देखील आयोजकांनी सांगितले. दरम्यान यावेळी स्पर्धेच्या ट्रॉफीमध्ये देखील बदल करण्यात आले. सहभागी आठ संघाचे कर्णधार व खेळाडूंच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. शिवाय प्रत्येक खेळाडूंनी आपापल्या संघाच्या तयारीबाबत माहिती देऊन विजेतेपद पटकावण्याचा निर्धार देखील केला.
‘बिग बी’ गाणार राष्ट्रगीत..
याआधीच अमिताभ बच्चन यांनी गायलेले प्रो कबड्डी थीम साँग गाजत असतानाच, कबड्डी चाहत्यांना आणखी एक सरप्राई मिळणार आहे. यंदाच्या सत्रातील सलामीच्या सामन्याआधी खुद्द बिग बी राष्ट्रगीत गाणार आहेत.