दुसरा आनंद लवकरच

By admin | Published: January 5, 2016 11:57 PM2016-01-05T23:57:45+5:302016-01-05T23:57:45+5:30

भारतात दुसरा आनंद निर्माण होण्यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे आशावादी वक्तव्य पाच वेळचा जगज्जेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने मंगळवारी केले.

Second happiness soon | दुसरा आनंद लवकरच

दुसरा आनंद लवकरच

Next

नागपूर : भारतात दुसरा आनंद निर्माण होण्यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नसून त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असे आशावादी वक्तव्य पाच वेळचा जगज्जेता ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने मंगळवारी केले. राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी येथे आलेल्या आनंदने पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
अन्य लीगच्या माध्यमातून खेळाचा प्रसार होत असताना बुद्धिबळ हा खेळ लीग किंवा टीव्हीच्या माध्यमातून तळागाळात पोहोचविण्यासाठी काही सूचना आहेत का, यावर आनंद म्हणाला, ‘‘महाराष्ट्रात त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या खेळासाठी पायाभूत सुविधांची विशेष गरज नसल्यामुळे केवळ तळागाळात पोहोचण्याचे
लक्ष्य आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यात बऱ्याच अंशी
मदत मिळेल. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.’’
पाच वर्षांपूर्वी चीन बुद्धिबळ वर्तुळात पिछाडीवर होता; पण आता त्यांच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. त्यातुलनेत भारतीय खेळाडूंना मात्र विशेष छाप पाडता आलेली नाही, याबाबत स्पष्टीकरण देताना आनंद म्हणाला, ‘‘चीनच्या खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरत असली तरी भारतीय खेळाडूंमध्ये प्रतिभा नाही, असे म्हणता येणार नाही. भारतीय खेळाडू छाप पाडण्यात यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे. केवळ त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.’’
व्लादिमीर क्रामनिक हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. त्याचा खेळ इनोव्हेटिव्ह आहे. कार्ल्ससनही चांगला खेळाडू आहे, असेही आनंदने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
बुद्धिबळ या खेळाला जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे जीवनात नव्या आव्हानांना सामोरे जाण्याचे तत्त्वज्ञान मिळते. कुठल्याही अडचणीच्या स्थितीत गोंधळून न जाता त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती बुद्धिबळ या खेळामुळे रुजण्यास मदत मिळते, असेही आनंद म्हणाला.
प्रत्येक खेळात वय हा मुद्दा ऐरणीवर असतो. तोच नियम बुद्धिबळाला लागू होतो; पण मी खेळाचा अद्याप आनंद घेत आहे, असे आनंदने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Second happiness soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.