दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेेत
By Admin | Published: March 6, 2017 05:30 PM2017-03-06T17:30:23+5:302017-03-06T17:30:23+5:30
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 92 धावांच्या भागिदारीमुळे यजमान भारतीय संघाने दुसऱ्या कोसोटीत 126 धावांची आघाडी घेतली आहे
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 92 धावांच्या भागिदारीमुळे यजमान भारतीय संघाने दुसऱ्या कोसोटीत 126 धावांची आघाडी घेतली आहे. पुणे कसोटीत 333 धावांनी पराभव स्वीकारणारा भारतीय संघाचा पहिला डाव 189 धावांत संपुष्टात आल्यानंतर पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 276 धावा करत 87 धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात भारताने चार बाद 213 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी चेतेश्वर पुजारा 79, तर अजिंक्य रहाणे 40 धावांवर खेळत आहेत. कर्णधार विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. वैयक्तिक 15 धावसंखेवर हेजलवूडने पायचित केले. पहिल्या डावात अर्धशतक करत भारताच्या धावसंखेला आकार देणाऱ्या राहुलने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. राहुलने 85 चेंडूत 51 धावांची खेळी केली , यामध्ये चार चौकारांचा समावेश आहे. जडेजा (2), मुकुंद(16) धावांवर बाद झाले. पाहुण्या संघाकडून हेजलवूडने सर्वाधिक तीन फलंदाजांना बाद केले.
दरम्यान, दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश आलं. फिरकीपटू रविद्र जडेजाच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने कांगारूंचा डाव संपुष्टात आणला. जडेजाने 63 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. अश्विनने दोन तर शर्मा आणि यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कालच्या 6 बाद 237 धावांहून पुढे खेळताना कांगारूंनी सुरूवातीला सावध पवित्रा घेतली. काल नाबाद असलेले स्टार्क आणि वेड यांनी आघाडी 50 धावांच्या पुढे नेली. संघाच्या 269 धावा असताना अश्विनने स्टार्कला (26) बाद करत ही जोडी फोडली आणि पुढच्या अवघ्या 8 धावांमध्ये कांगारूंचा डाव जडेजाने संपुष्टात आणला.
त्यापुर्वी काल सलामीवीर मॅट रेनशॉ व शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतकी खेळी, भारताचे सुमार क्षेत्ररक्षण आणि डीआरएसच्या चुकीचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व कायम राखले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 237 धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 48 धावांची आघाडी घेतली होती.