दुय्यम प्रशिक्षक सर्वोत्तम खेळाडू घडवणार नाहीत, पी. गोपीचंद यांचे स्पष्ट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 08:47 AM2021-05-28T08:47:47+5:302021-05-28T08:48:24+5:30
Badminton News: दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.
नवी दिल्ली : ‘विदेशी आणि भारतीय प्रशिक्षकांचे चांगले मिश्रण देशातील क्रीडा व्यवस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. मात्र, प्रशिक्षकांचा दर्जा उच्च असला पाहिजे. कारण, दुसऱ्या श्रेणीचे विदेशी प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील’, असे मत भारताचे बॅडमिंटन प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले.
गोपीचंद यांनी गुरुवारी प्रशिक्षक शिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या वेळी त्यांनी प्रशिक्षकांचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, ‘विदेशी प्रशिक्षक खेळाडू आणि खेळाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत. विदेशी प्रशिक्षकांचे चांगले मिश्रण असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जेव्हा खेळामध्ये आपल्याकडे प्रावीण्य नसते, तेव्हा सुरुवातीला पूर्णकालीन विदेशी साहाय्यक संघात ठेवणे चांगले ठरते. मात्र, आपण त्यांना कायम ठेवले, तर आपण आपल्या व्यवस्थेला न्याय देऊ शकणार नाही.’
गोपीचंद पुढे म्हणाले, ‘अशा प्रशिक्षकांकडून आपण शिकायला पाहिजे. पण, हे दुसऱ्या श्रेणीचे प्रशिक्षक केवळ दुसऱ्या श्रेणीचेच खेळाडू घडवतील, सर्वोत्तम खेळाडू नाही.’
आपल्याला कधीही सर्वोत्तम विदेशी प्रशिक्षकाची सेवा मिळालेली नाही. आपल्याला नेहमी दुसरा सर्वोत्तम प्रशिक्षकच मिळणार. भारतीय प्रशिक्षक कायम भारताच्या विजयासाठीच प्रयत्न करणार, तर विदेशी प्रशिक्षक केवळ आपला करार कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार. त्यामुळे ज्या खेळांमध्ये आपण सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत, अशा खेळांमध्ये खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून घडविण्यात आले पाहिजे.
- पी. गोपीचंद