सेहवाग व मुडी यांनी प्रशिक्षकपदासाठी केले अर्ज
By admin | Published: June 2, 2017 03:13 AM2017-06-02T03:13:23+5:302017-06-02T03:13:23+5:30
दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी
नवी दिल्ली : दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा कार्यकाळ संपत असून हे स्थान रिक्त होणार आहे. कुंबळे यांना प्रक्रियेमध्ये थेट सहभागी होता येईल तर अन्य दावेदारांमध्ये आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक टॉम मुडी व इंग्लंडचे रिचर्ड पायबस यांचा समावेश आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेश व भारत ‘अ’ संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. या शर्यतीत सेहवाग सामील झाल्यामुळे लढतीला रंगत आली आहे. सेहवागला प्रशिक्षणाचा कुठलाही अनुभव नाही, पण किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा मेंटर होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने त्याला प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदाचा अंतिम निर्णय घेईल. या समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)