सेजल नायरची ‘सुवर्ण’ धाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 10:09 PM2019-03-23T22:09:41+5:302019-03-23T22:09:54+5:30
२०० मीटर शर्यतीत गोल्ड : ‘लोकविश्वास’चा विश्वास सार्थ
संदीप कांबळे, फोंडा : अबुधाबी येथे झालेल्या ‘स्पेशल आॅलिम्पिक’मध्ये गोमंतकीयांनी छाप सोडली. सबिता यादव हिच्यापाठोपाठ ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठानची विद्यार्थिनी सेजल नायर हिनेही सुवर्ण पदक प्राप्त करीत गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. स्पर्धेत सबिता व सेजलच्या बहारदार खेळामुळे गोव्याला दोन सुवर्ण पदके प्राप्त झाली आहेत. सेजल नायरने २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
सेजल नायर या विशेष मुलीने मिळविलेल्या सुवर्ण पदकामुळे केवळ शाळेचेच नव्हे, तर गोव्याचे नाव जागतिक पातळीवर झळकले आहे, अशी प्रतिक्रिया लोकविश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप प्रियोळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बालवयातच आईची माया हरवली. त्यातच ती विशेष असल्याने जगात काय घडतंय हे तिला कळत नसताना मावशीने दिलेला मायेचा हात आज तिला उंच शिखरावर घेऊन गेला आहे. सेजलच्या मावशीनेच तिच्यावर संस्कार करीत तिला या जगात वावरायला शिकवले, असेही प्रियोळकर यांनी सांगितले.
१५ वर्षीय सेजल राजकुमार नायर ही दिव्यांग आहे. असे असतानाही तिने कवळे येथील पंचायतीसमोर असलेल्या खडकाळ मैदानावर धावण्याचा सराव केला आहे. या मैदानावर कोणतीही चांगली सुविधा नसून, मैदान अगदी खडकाळ आहे. तरीही सेजलने न डगमगता मुख्याध्यापक अरविंद मोरे व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव केला. त्याचे फलित म्हणूनच अबुधाबी येथे तिने सुवर्णपदक प्राप्त केले, असे मत मुख्याध्यापक मोरे यांनी व्यक्त केले.
...अन् सेजलच्या मावशीच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
सेजल नायर हिची आई लहानपणीच गेल्याने तिचा सांभाळ ललन सावंत या तिच्या मावशीने केला. मावशीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मिळेल ते काम करून सेजलसाठी कष्ट घेणाºया ललन सावंत यांना सेजलने अबुधाबी येथे सुवर्ण पदक पटकावल्याचे कळताच त्यांच्या डोळ््यांत आनंदाश्रू आले. सेजलने आपल्या कष्टाचे चीज केले आणि लेकीने जगभरात नाव कमावले, अशी प्रतिक्रिया ललन सावंत यांनी दिली. सेजलसारख्या असंख्य दिव्यांग मुलांना आजही मदतीची खरी गरज अस गरज आहे.
मंत्री ढवळीकरांचे केवळ आश्वासन...
कवळे पंचायतीच्या समोरील मैदान हे खडकाळ आहे. या मैदानावर सोयी-सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी सरपंच राजेश कवळेकर यांनी स्थानिक मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे अनेकदा मागणी केली आहे. मडकई येथील क्रीडा मैदान प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ््यात या मागणीचा राजेश कवळेकर यांनी पुनरुच्चार केला होता. त्यावेळी मंत्री ढवळीकर यांनी दोन महिन्यांत कवळेतील क्रीडा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही हे आश्वासन पूर्ण करण्याबाबत कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत.