चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी लवकर संघ निवडा
By Admin | Published: May 5, 2017 01:00 AM2017-05-05T01:00:54+5:302017-05-05T01:00:54+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या समितीने (सीओए) लवकरात लवकर संघ निवड करण्याचे निर्देश दिले आहेत. सीओएने यासंदर्भात बीसीसीआयला आधीही सूचना केली होती. आज संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना पाठविण्यात आलेल्या सात सूचनांच्या पत्रात कठोर शब्दांत कान उपटण्यात आले. आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणाऱ्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची २५ एप्रिलची ‘डेडलाइन’देखील पाळली नव्हती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा ५७ लाख डॉलरवरून कमी करून २९.३ लाख डॉलरवर आणला आहे.
सीओएने सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये संघ निवड टाळल्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे सूचित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संघ पाठविण्याची अखेरची तारीख २५ एप्रिल होती, पण संघाची अद्याप निवड झाली नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. निवड समितीची त्वरित बैठक बोलवून संघ निवडा. नंतर यादी आयसीसीला सोपविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. भारतीय संघ जगात सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेतून माघार घेण्याआधी याचा विचार करा. बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होऊ देण्याऐवजी टीम इंडियाच्या भल्यासाठी काम करा. खेळाडूंचे हित सर्वतोपरी असल्याचे भान ठेवा, असेही सीओएने पत्रात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
टीम इंडियासाठी नवे टी-शर्ट!
मुंबई : टीम इंडियासाठी नवे टी-शर्ट तयार झाले आहेत. या टी-शर्टचा शुभारंभ बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी गुरुवारी केला. या टी-शर्टवर चीनची मोबाईल कंपनी असलेल्या ‘ओपो’चे नाव आहे. जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारतीय खेळाडू नवे टी-शर्ट घालणार आहेत. बीसीसीआयने एका उद्योग समुहाबरोबर १.०९७ कोटी रुपयांचा ५ वर्षांसाठी १ एप्रिलपासून करार केला.