प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर

By admin | Published: July 11, 2017 02:19 AM2017-07-11T02:19:15+5:302017-07-11T02:19:15+5:30

वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे.

Selection of coach postponed | प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर

प्रशिक्षकपदाची निवड लांबणीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे. कर्णधार कोहलीशी चर्चा करून निर्णय घेऊ,’ असे सांगत भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुली याने सांगितले. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा आणखी लांबली आहे. सोमवारी मुंबईत बीसीसीआय कार्यालयामध्ये प्रशिक्षकपद निवडीची प्रक्रिया झाल्यानंतर गांगुलीने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या वेळी, सीएसी सदस्य व्हीव्हीएस लक्ष्मण आणि बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांचीही उपस्थिती होती.
सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीकडे लागले असताना, गांगुलीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर क्रिकेटचाहत्यांची निराशा झाली. विशेष म्हणजे, याप्रकरणी कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगत गांगुलीने लक्ष वेधले. गांगुलीने सांगितले, ‘कर्णधार विराट कोहलीशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकपदाचा निर्णय घेण्यात येईल. येणाऱ्या दोन-तीन दिवसांत हा निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रक्रियेपासून कोहली दूर राहिला, याचे त्याला श्रेय दिले गेले पाहिजे. त्याने कोणाच्याही नावाची शिफारस केली नाही.’ दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये सीएसीने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली. यामध्ये रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त बीसीसीआयकडे दोड्डा गणेश, लान्स क्लुसनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचेही अर्ज आले होते. दरम्यान, या मुलाखती प्रक्रियेमध्ये सीएसी सदस्य गांगुली आणि लक्ष्मण यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
>शास्त्री प्रबळ दावेदार नाही?
भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात मुख्य शर्यत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, आता सीएसीच्या भूमिकेनंतर असे दिसत नाही. प्रशिक्षकपदाच्या अंतिम निवडीची घोषणा पुढे ढकलणे आणि सेहवागची प्रत्यक्ष मुलाखत दोन तास रंगणे, यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये केवळ सेहवाग एकटाच प्रत्यक्षपणे बीसीसीआय सेंटरवर उपस्थित होता.
यामुळेही शास्त्री यांची पीछेहाट झाल्याची चर्चा रंगत आहे. शास्त्री यांनी सुरुवातीला या पदासाठी अर्ज केला नव्हता, परंतु जेव्हा बीसीसीआयने अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ जुलैपर्यंत वाढवली, तेव्हा शास्त्री यांनी लगेच आपला अर्ज भरला. शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असून संघ निर्देशक म्हणून त्यांची मागची कामगिरी चांगली आहे. दरम्यान, शास्त्री यांचे कोहलीसह चांगले संबंध असले तरी सीएसी सदस्य गांगुलीसह त्यांचे मतभेद आहेत आणि हीच त्यांची मुख्य अडचण ठरू शकते.
दुसरीकडे, सेहवागचे सर्व खेळाडूंसह आणि मुख्य म्हणजे सीएसी सदस्यांसह खूप चांगले संबंध आहेत. परंतु, प्रशिक्षक म्हणून तो पिछाडीवर आहे. आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मेंटॉर राहिला, मात्र संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली. उच्चस्तरावरील प्रशिक्षकपदाचा सेहवागकडे कोणताही अनुभव नाही.
प्रशिक्षक कसे काम करतात,
हे कोहलीला समजून घ्यावे लागेल. जेव्हा तो वेस्ट इंडिजवरून परतेल, तेव्हा या विषयावर आम्ही त्याच्याशी चर्चा करू. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान कोहलीशी अत्यंत वेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली होती. भारतीय क्रिकेटसाठी सर्वोतम निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रशिक्षक, कर्णधार व खेळाडूच भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जातील. प्रशिक्षकनिवडीनंतर सीएसीचे काम संपेल. प्रशिक्षकाची निवड करणे सोपी गोष्ट नसून घाईमध्ये ही निवड करणे योग्य नाही. या प्रशिक्षकपदाची निवड २ वर्षांच्या दीर्घ काळापर्यंत होणार आहे.
- सौरभ गांगुली, सीएसी सदस्य
>फेसबुक लाईव्ह चॅट
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, नुकताच झालेला विंडीज दौरा आणि सध्या गाजत असलेला प्रशिक्षकपदाच्या
निवडीचा प्रश्न... या सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक अयाझ मेमन यांचा खास
लाईव्ह चॅट
दुपारी ३ वाजता

Web Title: Selection of coach postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.