भारतीय संघाची निवड आज
By admin | Published: September 12, 2016 12:57 AM2016-09-12T00:57:05+5:302016-09-12T00:57:05+5:30
संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती आज सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी यजमान संघाची निवड करणार आहे
मुंबई : संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती आज सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी यजमान संघाची निवड करणार आहे. निवड समितीच्या बैठकीत रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील निराशाजनक कामगिरी चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्यातील रोहितच्या निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीला त्याच्यावर विश्वास आहे. वन-डे स्पेशालिस्ट रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळायला हवी, असे विराटचे मत आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध अलीकडेच संपलेल्या मालिकेत त्याला चारपैकी दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर ग्रोस आइलेटमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ९ व ४१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे निवड समिती या २९ वर्षीय फलंदाजावर भविष्यात किती विश्वास दाखविते, याबाबत उत्सुकता आहे.
आघाडीच्या फळीतील अन्य एक फलंदाज चेतेश्वर पुजारावर नेहमी टांगती तलवार असते. त्याला विंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात बाहेर बसावे लागले. पुजाराने दोन डावात ६२ धावा फटकावल्या, पण दुलीप ट्रॉफी स्पर्धेत त्याने सलग दोन शतके झळकावित सूर गवसल्याचे संकेत दिले आहे. त्याला संघात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अश्विन व्यतिरिक्त विंडीजविरुद्ध १० पेक्षा अधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा अनुभवी ईशांत शर्माच्या साथीने वेगवान गोलंदाजीचे आक्रमण सांभाळणार असल्याचे निश्चित आहे.
विंडीज दौऱ्यावर या दोघांव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व शार्दुल ठाकूर हे गोलंदाजही होते, पण मालिका भारतात खेळल्या जाणार असल्यामुळे यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता धूसर आहे. भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी-मार्च २०१७ पर्यंत यंदाच्या मोसमात १३ कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यामुळे निवड समिती वेगवान गोलंदाजांबाबत ‘रोटेशन’ रणनीतीचा वापर करण्याची शक्यता आहे. सध्या भारत ‘अ’ संघासोबत आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वरुण अॅरोनसारख्या गोलंदाजाला यंदाच्या मोसमात कुठल्याही क्षणी राष्ट्रीय संघात संधी मिळू शकते.
एक विचार करता विंडीज दौऱ्यावर २-० ने विजय मिळवणाऱ्या भारतीय संघात बदल होण्याची शक्यता नाही. यष्टिरक्षक रिद्धिमान साहसह विंडीज दौऱ्यावर गेलेले अन्य खेळाडू संघात कायम असण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला २२ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये प्रारंभ होणार आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदविणाऱ्या मुंबईच्या या फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के करता आलेले नाही. रोहितने वेस्ट इंडीजविरुद्ध २०१३ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या मालिकेत सलग दोन शतके झळकावित कसोटी कारकिर्दीची शानदार सुरुवात केली होती. त्याच्या भात्यात अनेक फटके आहेत, पण त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे अंतिम संघात त्याला स्थान पक्के करता आलेले नाही.
रोहितला ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या दुलीप करंडक अंतिम लढतीत पहिल्या डावात विशेष छाप सोडता अली नाही. तो शनिवारी ३० धावा काढून बाद झाला. युवा खेळाडू श्रेयस अय्यर, मनीष पांडे व करुण नायर चांगली कामगिरी करीत असल्यामुळे निवड समितीचे काम कठीण झाले आहे.
रवींद्र जडेजा यालाही दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास सांगितले होते. जडेजाने ग्रास आइलेटमध्ये २२ धावांची खेळी केली होती व तीन बळीही घेतले. त्याची चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली होती; पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. जडेजाला चायनामन गोलंदाज कुलदीप यादव व लेग स्पिनर अमित मिश्राकडून आव्हान मिळत आहे.
कुलदीपने इंडिया रेडतर्फे दुलीप ट्रॉफी स्पर्धेत १३ बळी घेतले. मिश्राने विंडीज दौऱ्यात चारपैकी दोन कसोटी सामने खेळले. तो अश्विनची साथ देण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.