भारतीय संघाची निवड आज
By admin | Published: November 2, 2016 07:09 AM2016-11-02T07:09:50+5:302016-11-02T07:09:50+5:30
इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज, बुधवारी करण्यात येणार आहे.
मुंबई : इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज, बुधवारी करण्यात येणार आहे. त्यात फिट वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे; पण सलामी जोडीची निवड करताना राष्ट्रीय निवड समितीला मात्र पुन्हा चर्चा करावी लागणार आहे.
‘बीसीसीआय’च्या सूत्रानी सांगितले की, भारतीय संघाची निवड बुधवारी मुंबईत करण्यात येणार आहे. भारतीय संघाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला असला, तरी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीला पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड करताना काही बाबींवर विशेष भर द्यावा लागणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि ईशांत शर्मा आजारी असल्यामुळे निवड समितीने अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व आॅफ स्पिनर जयंत यादव यांना कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पाचारण केले होते.
गंभीरला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळाली नाही; पण कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर गंभीरला इंदूरमध्ये कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. धवनच्या स्थानी करुण नायरला संघात स्थान देण्यात आले होते; पण त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. जयंत यादवलाही दोन्ही कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले नाही.
जर राहुल आणि धवन फिट असतील, तर निवड समिती पुन्हा एकदा गंभीरला स्थान देते का, याबाबत उत्सुकता आहे. गंभीरने इंदूरमध्ये दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी केली होती. गंभीरने दिल्लीतर्फे ओडिशाविरुद्धच्या रणजी लढतीत १४७ धावांची खेळी केली होती.
केएल राहुल व भुवनेश्वर कुमार दुखापग्रस्त झाल्यानंतर एकही सामना खेळलेले नाही. त्यांना आता मॅच फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. राहुल स्नायूच्या दुखापतीतून सावरत असून, भुवनेश्वरच्या टाचेला दुखापत झाली आहे. जोपर्यंत हे खेळाडू मॅच फिटनेस सिद्ध करीत नाहीत, तोपर्यंत त्यांची निवड होण्याची शक्यता कमी आहे. अशीच स्थिती बोटाच्या दुखापतीतून सावरत असलेल्या धवनबाबत आहे. दरम्यान, पाहुणा इंग्लंड संघ बुधवारी बांगलादेशहून भारतात दाखल होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले.
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंग्लंड संघ येथे सराव सामना खेळणार नसून पहिल्या कसोटी सामन्यासाठी राजकोटला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट क्लब आॅफ इंडियावर केवळ ५ नोव्हेंबर रोजी सराव सत्रात सहभागी होणार आहे.’ सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ‘सध्या निश्चित असलेल्या कार्यक्रमानुसार इंग्लंड संघ केवळ एका सराव सत्रात सहभागी होणार आहे. जर त्यांना अधिक सराव सत्राची गरज असेल, तर तशी व्यवस्था करण्यात येईल.’
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुनियातून सावरला असून, त्याचे पुनरागमन निश्चित आहे. त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती; पण त्याला मालिकेत एकही सामना खेळता आला नाही. त्यानंतर तो दोन रणजी सामने खेळला आणि ४० पेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील उर्वरित संघात विशेष बदल होण्याची शक्यता नाही.