मुंबई संघाच्या प्रशिक्षकाची निवड २ जूनला होणार
By admin | Published: May 31, 2017 03:18 AM2017-05-31T03:18:49+5:302017-05-31T03:18:49+5:30
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध वयोगटाच्या संघासाठी प्रशिक्षक नेमले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये विविध वयोगटाच्या संघासाठी प्रशिक्षक नेमले. विशेष म्हणजे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या रणजी ट्रॉफी मुंबई संघाच्या प्रशिक्षकाच्या निवडीचा निर्णय मात्र एमसीएने काही दिवसांकरीता पुढे ढकलला आहे. २ जूनला मुंबईच्या प्रमुख संघाच्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती एमसीए सुत्रांकडून मिळाली.
या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एमसीएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीएने रणजी ट्रॉफीव्यतिरिक्त मुंबईच्या इतर सर्व वयोगटाच्या संघांच्या प्रशिक्षकपदासाठी निवड केली आहे. रणजी संघाच्या प्रशिक्षक पदाच्या निवडीची घोषणा २ जूनला करण्यात येईल. मुंबईच्या रणजी संघाच्या प्रशिक्षपदासाठी माजी कसोटीपटू प्रवीण आमरे आणि माजी यष्टीरक्षक समीर दिघे यांची नावे शर्यतीत आहेत.
‘मुंबईचा प्रशिक्षक या दोन व्यक्तींपैकीच एक असेल,’ अशी महत्त्वपुर्ण माहितीही सुत्रांनी दिली. मुंबई रणजी संघाचे विद्यमान प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना रणजी ट्रॉफी संघाकडे कायम राखण्यात अपयश आले.
दरम्यान, एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे एमसीएने आपल्या विविध वयोगटाच्या संघांच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली.
निवड झालेले प्रशिक्षक :
२३ वर्षांखालील : अमित पागनिस
१९ वर्षांखालील : सतिश सामंत
१६ वर्षांखालील : विनायक माने
१४ वर्षांखालील : संदेश कावळे
वरिष्ठ महिला : अपर्णा कांबळी
१९ वर्षांखालील महिला :
जयेश दादरकर
विद्यापीठ पुरुष : विनय दांडेकर
विद्यापीठ महिला : स्वाती पाटील